दरवर्षी बळी घेणारा 'तो' पूल केव्हा बनणार?
By Admin | Updated: July 29, 2015 00:34 IST2015-07-29T00:32:27+5:302015-07-29T00:34:22+5:30
डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका

दरवर्षी बळी घेणारा 'तो' पूल केव्हा बनणार?
धोका : डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका नाल्याला बसत आहे. त्यामुळे पुलावरून पाणी वाहून जात असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून येथूनच मार्गक्रमण करावे लागते. याच पुलाच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत तिघांचा बळी : गावात शोककळा अन् प्रशासनाविरूद्ध तीव्र रोष
लाखांदूर : डोकेसरांडी-ओपारा गावाच्या मधोमध नाल्यावर गोसे धरणाच्या डाव्या कालव्याच्या सदोष बांधकामाचा फटका नाल्याला बसला आहे. दररोज पूरपरिस्थिती निर्माण होवून ओपारा येथील एकाचा बळी दरवर्षी घेणाऱ्या या पूलामुळे प्रशासनाविरूद्ध तीव्र रोष खदखदत आहे.
पावसाळ्याच्या दिवसात ओपारा येथील गावकऱ्यांना अडचणीचा तसेच जिवघेणा त्रास सहन करावा लागतो. डोकेसरांडी-ओपारा गावाचा मधात नैसर्गीक नाला आहे. या नाल्यावर इंग्रजकालीन पूल अखेरची घटका मोजत आहे. २५ जुलैला पत्नीच्या चौदावीचा सामान घेवून डोकेसरांडी वरून ओपराकडे जात असताना पूलावरील पाणी ओलांडत असताना गोपीचंद आडकिने (३२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
यापूर्वी याच नाल्याच्या पूरात जनाबाई ढोरे (६०) मागील वर्षी रामभाऊ राऊत (५०) हे दोघेही वाहून गेले होते. यावेळी माजी के. मंत्री प्रफुल्ल पटेल, तत्कालीन पालकमंत्री गोंदिया अनिल देशमुख खासदार नाना पटोले, राजेंद्र जैन, सुनिल फुंडे यांनी भेटी देवून रामसेतू नावाचा पूल बांधून देण्याचे पोकळ आश्वासन दिले होते. मात्र यावर्षीही पुन्हा पूलाचे बांधकाम न झाल्याने पुन्हा एकाचा नाहक बळी गेला. (तालुका प्रतिनिधी)