कधी संपणार जगण्याचा संघर्ष?

By Admin | Updated: November 8, 2014 22:32 IST2014-11-08T22:32:23+5:302014-11-08T22:32:23+5:30

शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे.

Ever struggling to survive? | कधी संपणार जगण्याचा संघर्ष?

कधी संपणार जगण्याचा संघर्ष?

जिल्ह्यात हजाराच्यावर भिकारी : महिला भिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्र नाही
भंडारा : शहरात पाच हजाराच्यावर भिकाऱ्यांची संख्या आहे. यातच महिला भिकाऱ्यांची संख्या मोठी असताना त्यांच्यासाठी स्वतंत्र पुनर्वास केंद्रच नसल्याने चौकाचौकात, रस्त्यांवर त्रास वाढला आहे. भिकारी उदंड जाहले, पण प्रशासन थंडच राहिले, असे वास्तव सध्या समोर येऊ लागले आहे
जखमेचे प्रदर्शन करणे किंवा लहान मुलांना समोर करून भीक मागणे हा गुन्हा आहे. असे असताना शहरातील अनेक भागात हा प्रकार सर्रास दिसून येतो. जिल्ह्यातील चौकाचौकात, रस्त्यांवर, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, दवाखाने, मंगल कार्यालय, शासकीय कार्यालय, मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भिकाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. एक रुपया दे दे बाबा.. भगवान तुम्हारी मांग पुरी करेगा.. अशा आर्जवांसह कधी आपले अपंगत्व दाखवत, तर कधी पदराआड लहान मुलांना पुढे करून शहरात जागोजागी भिकारी भीक मागताना दिसतात. पाचवीला पुजलेली गरिबी, दारिद्र्याचे जिणे व असह्य रोगांवरील उपचारासाठी भासणारी आर्थिक चणचण, यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. भिकाऱ्यांना अटक करा आणि भिक्षेकरी स्वीकार केंद्रत टाका, असे आदेश आहेत. मात्र शहरात आजही मोठ्या संख्येत भिकारी मोकळे आहेत.
शासनातर्फे भिकाऱ्यायांसाठी भिक्षेकरी स्वीकार केंद्र चालविले जाते. विदर्भातील नागपूर येथे या एकमेव केंद्राची स्थापना १ एप्रिल १९७४ रोजी झाली. मुंबई भिक्षा प्रतिबंधक अधिनियम १९५९ अन्वये या केंद्राची स्थापना करण्यात आली. राज्यात अशी एकूण १५ केंद्रे आहेत. मुंबई, पुणे, अहमदनगर, रायगड, सोलापूर या ठिकाणी ही केंद्र आहेत.
पोलिसांनी विविध ठिकाणाहून पकडून आणलेल्या या भिकाऱ्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच इथे प्रवेश दिला जातो. शहरात भीक मागणे हा व्यवसाय झाला आहे. यामुळे भिकारी पकडला गेला तरीही त्याला तत्काळ सोडविले जाते. यामुळेच की काय पोलिसांकडून भिकारी पकडण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे चित्र आहे. भिक्षेकरी स्वीकार केंद्रात पोलिसांनी पकडलेल्या व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेल्या भिकाऱ्याला साधारण तीन महिन्यापर्यंत ठेवण्याचा नियम आहे. या कालावधीत त्याला जेवण कपडे, औषध या आवश्यक सुविधा मोफत पुरविल्या जातात. सोबतच स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. यात शिवणकाम व कार्यालयीन फाईलचे प्रशिक्षण दिले जाते. परंतु एवढे करूनही शहरात भिकाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
भीक देण्याच्या प्रवृत्तीवर आळा घाला
भाविनक पातळीवर जादा भीक पाडून घेण्यासाठी लहान मुलांना भाड्याने घेऊन त्यांचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यासाठी लहान मुलांचे अपहरण करून, त्यांना अपंग करून त्यांच्याकडून भीक मागविणाऱ्यांचेही मोठे रॅकेट राज्यात सक्रिय आहे.
असे असताना दुसरीकडे भिकाऱ्यांकडे दयेच्या नजरेने पाहून त्यांच्या हातात दहाची नोट ठेवणारे शेकडो दयावान भिकाऱ्यांना रोज भेटतात. त्यामुळेच ही संख्या वाढतेय. भीक देण्याच्या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. भीक देणे बंद झाल्यास याचा परिणाम भिकाऱ्यांच्या संख्येवर निश्चित दिसेल तसेच यातून फोफावत चालली गुन्हेगारीही कमी होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ever struggling to survive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.