कुशल-अकुशल कामाचे प्रमाण नसतानाही दिली प्रशासकीय मान्यता
By Admin | Updated: July 21, 2014 00:02 IST2014-07-21T00:02:59+5:302014-07-21T00:02:59+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोहयो सन २०१३-१४ मधील कुशल व अकुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० असे नसतानाही मोहाडी खंडविकास अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान केली.

कुशल-अकुशल कामाचे प्रमाण नसतानाही दिली प्रशासकीय मान्यता
करडी (पालोरा) : महाराष्ट्र ग्रामीण रोहयो सन २०१३-१४ मधील कुशल व अकुशल खर्चाचे प्रमाण ६०:४० असे नसतानाही मोहाडी खंडविकास अधिकाऱ्यांनी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रदान केली. काही विशिष्ट गावांना लाखो रुपयांचे निधीचे वाटप केले. सिमेंट रस्ते व नाली बांधकामे आटोपण्यात आली. पांदन रस्त्यासाठी मुरुम कामासाठी असलेला निधी दबावात वळवून राजकारणी व अधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे केल्याचा प्रकार उघडकीस आला असून चौकशीच्या मागणीचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
तालुक्यात पालोरा येथे सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव, नाला सरळीकरण किंवा पांदन रस्त्याची कामे झालेली नाहीत. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील तालुकास्तरीय अहवालाचा पडताळ केला असता सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात ४.४ लाखाची कामे झाल्याचे दर्शविण्यात आले. त्यापैकी मटेरिअलवर झालेला खर्च ४.३ लाख रुपये दाखविण्यात आला आहे. याचा अर्थ सदर वर्षात सिमेंट रस्ते किंवा इतर बांधकामासाठी (कुशल) कामांसाठी निधी शिल्लक असल्याचे दिसून येत नाही. पालोरा गावातील नागरिकांनी सुद्धा सदर वर्षात अकुशल कामे झाली नसल्याचे चर्चेदरम्यान सांगितले आहे.
सन २०१४-१५ वर्षासाठी तालुका स्तरावर तयार करण्यात आलेल्या आर्थिक परफार्मन्स अहवालाची तपासणी केली असता सदर वर्षात २१.६४ लाखाची कामे झालेली असल्याचे दर्शविण्यात आले. त्यातही मटेरिअलसाठी ३.७५ लाखाचा निधी खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले आहे. सन २०१४ वर्षात गावात तीन पांदन रस्त्याची कामे एप्रिल महिन्यानंतर सुरू करण्यात आली असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यावर मुरुम कामे होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात पालोरा गावात मग्रारोहयो अंतर्गत कामे झालेली नसताना कुशल व अकुशल कामांचे ६०:४० चे प्रमाण नसताना मोहाडी खंडविकास अधिकाऱ्यांनी सदर गावासाठी १५ लाखाच्या निधीचे दोन सिमेंट रस्ते मंजूर केले
.त्यामध्ये भैय्या कनोजकर ते गणेश कुकडे, सतिश गिऱ्हे ते साकोली रस्ता आणि दोन सिमेंट रस्त्यांचा कामाचा समावेश आहे. सदर दोन्ही कामे जुलै २०१४ या महिन्यात सुरू करण्यात आली. त्यापैकी उपरोक्त पहिल्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र दुसरा रस्ता अर्धवट अवस्थेत बंद करण्यात आला. पहिल्या रस्त्यासाठी ६,०१,७०० रुपयाचा निधी तर दुसऱ्या रस्त्यासाठी ९,०२,८०० रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. एकूण १५ लक्ष ४५ हजार रुपये दोन्ही कामासाठी खंडविकास अधिकारी मोहाडी यांनी तांत्रिक मान्यता ४ जानेवारी २०१४ रोजी तर प्रशासकीय मान्यता ६ जानेवारी २०१४ रोजी प्रदान केली होती. सदर कामे दबावात व विशिष्ट गावातील राजकीय पदाधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी दिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. ६०:४० चे प्रमाण पूर्ण न करणाऱ्या विशिष्ट गावांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आपले उखळ पांढरे केले असून संगनमताने जाणीवपूर्वक गैरप्रकार झालेला असलल्याचे दिसून येत आहे. सदर अवैध प्रकाराची तक्रार भाजपचे तालुकाध्यक्ष तथा पांजरा (बोरी) ग्रामचे सरपंच भगवान चांदेवार यांनी वैयक्तिकरीत्या केली आहे. पालोरा गावात व पंचायत समितीमध्ये भाजपचीच सत्ता असताना तक्रार करण्यात आल्याने राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या असून प्रकरणी काय निर्णय घेतला जातो, कारवाई केली जाते किंवा नाही याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)