धान केंद्रावरील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:25+5:302021-03-28T04:33:25+5:30

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल ...

Establish a committee to investigate irregularities at the paddy center | धान केंद्रावरील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

धान केंद्रावरील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन करा

भंडारा जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर होणाऱ्या गैरप्रकाराचा लेखाजोखा मांडण्याच्या दृष्टीने खासदार सुनील मेंढे यांनी मंत्री पियुष गोयल यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदारांनी त्यांना निवेदन दिले.

भंडारा व गोंदिया जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या दोन्ही जिल्ह्यातील ७० टक्के शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला धान केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यशासन खरेदी करतो. मात्र महाराष्ट्र शासनाची उदासीनता शेतकऱ्यांना अडचणीत आणत असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी निवेदनात म्हटले आहे. राज्य शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करण्यास एक महिना उशीर केला. व्यापारी यांना फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा संशय या पत्रात खासदारांनी व्यक्त केला आहे. सोबतच २०-२० किलोमीटरचे अंतर कापून शेतकऱ्यांना केंद्रावर धान विकण्यास भाग पाडले जात आहे.

धान खरेदी केंद्र आहे व्यापाऱ्यांसाठी की शेतकऱ्यांसाठी हा प्रश्न काही गोष्टी पाहता उपस्थित होतो. नियमानुसार इतर राज्यातून धान्य आयात करून तो केंद्रांवर विकणे बेकायदेशीर आहे. परंतु हा प्रकार सध्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात सुरू आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यातून ११०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावर व्यापारी जास्त दराने विकून नफा कमवित आहेत. शेतकऱ्यांचे धान साठवण्यासाठी असलेली गोदामे व्यापाऱ्यांचा खरेदी केलेल्या धान ठेवण्यासाठी वापरली जात आहे. केंद्रावर शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना प्राधान्य देण्याचे काम सुरू असून यात राज्य सरकारचे अधिकारी व्यापाऱ्याच्या सोबत असल्याचा आरोप खासदार मेंढे यांनी या पत्रात केला आहे. मोहाडी तालुक्यात पर राज्यातून आयात केलेला ५४२ कट्टे धान जप्त करण्यात आला. परंतु अजूनही त्या दोषींवर कारवाई न करण्यात आल्याचे खासदारांनी यावेळी मंत्र्यांना सांगितले.

प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. आलेल्या धान्याच्या नोंदी ठेवतानाही घोळ घातला जात आहे. दोन्ही जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर सर्रास होणारा गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रस्तरावर चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करावी व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी या पत्रातून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे खासदार मेंढे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

Web Title: Establish a committee to investigate irregularities at the paddy center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.