देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची मुजोरी
By Admin | Updated: June 5, 2014 23:48 IST2014-06-05T23:48:34+5:302014-06-05T23:48:34+5:30
देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता असून २४ तास रुग्णांना सेवा पुरविली जात नाही. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत.

देव्हाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचार्यांची मुजोरी
तुमसर : देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमितता असून २४ तास रुग्णांना सेवा पुरविली जात नाही. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. ५ ते १0 वर्षापासून स्थानांतरण का झाले नाही असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी व दोषींवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा गावकर्यांनी दिला आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत देव्हाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. सुमारे २४ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्राची आहे. या परिसरातील १८ ते २0 गावांना हे आरोग्य उपकेंद्र सेवा पुरविते. परंतु सध्या हे आरोग्य केंद्रच आजारी दिसत आहे.
येथील कर्मचारी येणार्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी उद्धट बोलतात. अपमानास्पद वागणूक देतात. उलट उत्तरे देणे येथे नित्यनियमांची बाब आहे. येथे डॉक्टर व कर्मचार्यांकरिता सदनिका आहेत. परंतु ते येथे राहत नाहीत. २४ तास सेवा पुरविण्याचा नियम असताना ती पुरविली जात नाही. मागील ५ ते १0 वर्षापासून कर्मचार्यांचे स्थानांतरण झाले नाही. अपडाऊन करणे हाच एकमेव व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णांनी पाठ फिरविली आहे. सुमारे ७0 ते ८0 लक्ष रुपये खर्च करून इमारती तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य केंद्र परिसरात गवताचे जंगल तयार झाले आहे. गांधी वॉर्डात नवीन उपकेंद्र सुरु करण्यात आले होते. दोन दिवसानंतर ते कायम बंदच आहेत. शासनाचा वेतन येथे नियमित घेतला जात आहे. परंतु कर्तव्य पार पाडले जात नाही. तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी येथे ढुंकूनही पाहत नाहीत. जनतेच्या पैशाचा अपव्यय करणे येथे सुरु आहे. येथील आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.कुरैशी यांचेकडे अनेकदा मौखीक तक्रारी करण्यात आल्या. परंतु त्यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही .येथील कर्मचारी उपकार केल्यासारखे वावरत आहेत. ५ ते १0 वर्ष झालेल्या कर्मचार्यांचे त्वरीत स्थानांतरण न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा गावकर्यांनी दिला जिल्हा आरोग्य अधिकार्यांना पाठविलेल्या तक्रारीतून केला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी येथे भेट देऊन स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थांशी चर्चा करण्याचीही मागणी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)