शेतबांधावर लाकडी खांबाद्वारे वीज पुरवठा
By Admin | Updated: April 16, 2016 00:25 IST2016-04-16T00:25:05+5:302016-04-16T00:25:05+5:30
महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यात लाकडांच्या खांबावरून वीजपुरवठा देण्यात आला.

शेतबांधावर लाकडी खांबाद्वारे वीज पुरवठा
चार वर्षांपासून सिमेंट खांबाची प्रतीक्षा : महावितरण आपल्या दारीमुळे अपघाताची शक्यता
मोहन भोयर तुमसर
महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना भंडारा जिल्ह्यात लाकडांच्या खांबावरून वीजपुरवठा देण्यात आला. सध्या या खांबाचे आयुष्य संपलेले आहे. सिमेंट खांबाहून विद्युत पुरवठा करणे येथे गरजेचे आहे. जीवंत विद्युत तारांमुळे शेकडो शेतकऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे.
मागील चार वर्षापूर्वी महावितरण कंपनीने महावितरण आपल्या दारी ही योजना शेतकऱ्यांकरिता सुरू केली होती. मागेल त्याला वीज असे हे ब्रिदवाक्य होते. भंडारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत सुमारे २४०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज पुरवठा करण्यात आला. ३ एच.पी. व ५ एच.पी.चा वीज पुरवठा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत करण्यात आला. शेतकऱ्यांनी अर्ज केल्यावर त्यांना वीज पुरवठा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत लाकडी खांबावर वीज तारा येथे ओढण्यात आला. पुढे सिमेंट खांब लावण्यात येतील, अशी ही योजना होती.
शेतीतील लाकडी खांब शेतीच्या धुऱ्यावर गाडण्यात आले. पावसाच्या पाण्यामुळे अनेक खांब खालून सडलेल्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
पावसाळ्यात वादळी सुसाट वारा घोंगावतो. या वाऱ्यात ही लाकडी खांब टिकाव धरू शकणार नाही. तांत्रिक सुविधांमुळे अपघाताची शक्यता नसली तरी त्याची हमी मात्र कुणीच देवू शकत नाही.
भंडारा जिल्ह्यात ४४५ कि़मी. वीज तारा शेतीपर्यंत वाहून नेण्याकरीता सिमेंट खांबाला सुमारे १४ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर माहिती मागितली असल्याची माहिती आहे. सदर प्रकरणात भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.
तुमसर तालुक्यात अशा लाकडी खांबाची संख्या मोठी आहे. महावितरणने तात्काळ सिमेंट खांब लावण्याची गरज आहे. सदर खांब अपघाताला नक्कीच आमंत्रण देणारे आहेत.
-विजय राणे, तालुका प्रमुख युवा सेना, तुमसर.
मागील चार वर्षापासून लाकडी खांबावर शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महावितरणने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा याकरिता आंदोलन करण्यात येईल.
- के.के. पंचबुद्धे, जि.प. सदस्य देव्हाडी.
लाकडी खांब बदलवून सिमेंट खांब लावण्याकरिता १४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात आला. लवकरच कारवाई होईल.
-ए.के. गेडाम, कार्यकारी अभियंता प्रशासन महावितरण, भंडारा.