जिल्ह्यात आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 06:00 AM2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:17+5:30

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.

Eight people die in a week in the district | जिल्ह्यात आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देपावसाचा कहर : घर पडून दोघांचा, तर पुरात वाहून सहा जणांचा मृत्यू, वैनगंगा धोक्याच्या पातळीवरच, अनेक घरांची पडझड

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात पावसाने कहर केला असून आठवडाभरात आठ जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. सहा जणांचा मृत्यू नदीच्या पुरात वाहून गेल्याने तर दोघांचा मृत्यू घर कोसळल्याने झाला. गत आठवडाभरापासून दररोज पाऊस कोसळत असून वैनगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. या अतिवृष्टीने शेती पिकांसोबतच अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून दररोज पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. नदी तीरावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे सहा जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. पवनी तालुक्यातील भेंडाळा येथील डेव्हिड गोपाल सोनटक्के (८) हा शनिवारला ७ सप्टेंबर रोजी गावानजीकच्या नाल्यात बुडाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच हाती आला. सूरनदीला आलेल्या पुरात शेतकरी केशव जागो मेश्राम रा. खमारी बुज. हा वाहून गेला. त्याचा दुसºया दिवशी मृतदेह हाती आला. तर चांदोरी-शिंगोरी नाल्याच्या पुरात जनावरांचे पिकअप वाहन वाहून गेले. सहा जनावरे मृत्युमुखी पडली. सुदैवाने चालक बचावला. तुमसर तालुक्यातील सिंदपुरी येथे रविवारी सकाळी शेजारी घराचे भींत कोसळून निलकराम ईसाराम शेंडे (५४) हा ठार झाला तर त्याची मुलगी कुंदा नेवारे (२४) आणि निर्मला वगारे (५०) या गंभीर जखमी झाल्या.
मंगळवारी पूर पाहण्यासाठी गेलेले साकोली तालुक्यातील सराटी येथील दोन तरूण वाहून गेले. निखिल केशव खांडेकर (१७), हितांशू प्रमोद खोब्रागडे (१९) अशी या तरूणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह नदीपात्रात आढळून आले. तर पवनी तालुक्यातील मौदी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची अद्यापही ओळख पटली नाही. लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील बबन जयराम कांबडी (६०) यांचा मृतदेह शेताच्या बांधीतील पाण्यात आढळून आला. यासोबतच लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घराची भिंत कोसळून अजय केशव हेमणे (३०) आणि अनिल केशव हेमणे हे दोघे भाऊ जखमी झाले. भंडारा तालुक्यातील परसोडी येथे भींत कोसळल्याने सविता सुर्यभान थेरे (५५) ही महिला जखमी झाली. साकोली तालुक्यातील उसगाव पुलावरून कार पुरात वाहून गेली होती. सुदैवाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
सततच्या पावसाने जिल्ह्यातील पन्नासावर घरांची पडझड झाली असून शेतशिवारात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होत आहे.

कारधा येथे वैनगंगेचा जलस्तर ९.३० मीटर
मध्यप्रदेशाच्या सीमावर्ती भागात झालेल्या अतिवृष्टीने आणि प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याने भंडारा येथून वाहनारी वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. धोक्याची पातळी ९.५ मीटर असून शुक्रवारी दुपारी २ वाजता ९.३० मीटर जलपातळी मोजण्यात आली. कालीसराट प्रकल्पाचे चार दरवाजे एक फूट आणि पुजारीटोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. तर धापेवाडा प्रकल्पाचे २३ दरवाजे ५.५. मीटरने उघडले आहे. यातून एक लाख २३ हजार ६०२.५० क्युसेक पाण्याचा विसर्ज सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैनगंगेची जलपातळी वाढली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाचे १७ दरवाजे एक मीटरने आणि १६ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. या प्रकल्पातून एक लाख ९२ हजार ८१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कारली येथे घर कोसळून वृद्ध ठार
तुमसर : तालुक्यातील कारली येथील मातीचे घर कोसळल्याने वृद्ध ठार झाला. ही घटना शुक्रवारच्या पहाटे घडली. दशरथ पुना नागपुरे (७५) असे मृताचे नाव आहे. तो आपल्या घरी झोपला होता. पावसाने घराची भींत कोसळली. त्यात त्याचा दबून मृत्यू झाला. सुदैवाने या कुटुंबातील अन्य दहा जण थोडक्यात बचावले. दशरथ नागपूरे यांच्या कुटुंबात तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. सुदैवाने ही मंडळी बचावली. आता घर पडल्याने या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी दशरथ नागपुरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात हळहळ व्यक्त होत आहे.

विसर्जनाला गेलेला तरूण बेपत्ता
गणपती विसर्जनासाठी गेलेला तरूण नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या ढोलसर येथे घडली. सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी तो गावातील नागरिकांसोबत गणपती विसर्जनासाठी गेला होता. मूर्ती पाण्यात विसर्जित करताना त्याचा तोल गेला आणि प्रवाहासोबत वाहून गेला. अद्यापही त्याचा थांगपत्ता लागला नाही. तहसीलदारांच्या मार्गदर्शनात बचाव पथकाद्वारे शोध जारी करण्यात आला.

Web Title: Eight people die in a week in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.