शिक्षणाला मूल्याची जोड आवश्यक
By Admin | Updated: December 25, 2016 00:50 IST2016-12-25T00:50:39+5:302016-12-25T00:50:39+5:30
महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणेच्या सहकार्याने राज्यातील ३४ जिल्ह्यात प्रत्येकी एका केंद्रात सुरू

शिक्षणाला मूल्याची जोड आवश्यक
शांतीलाल मुथ्था : तिल्ली (मोहगाव) येथे मूल्यवर्धन आढावा सादरीकरण
तिल्ली (मोहगाव) : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने व शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणेच्या सहकार्याने राज्यातील ३४ जिल्ह्यात प्रत्येकी एका केंद्रात सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करण्यासाठी कार्यक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये राज्य घटनेतील मूल्य रुजवावीत व भारताची आदर्श पिढी निर्माण व्हावी. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ सोबत ज्ञानरचनावाद अंमलात आला आहे. मूल्यवर्धन हा याला पुरक आहे. संगणकाला वायरसपासून वाचविण्यासाठी जसे अँटीवायरस मारले जाते तसे मूल्यवर्धन हे मुलांसाठी अँटीवायरस आहे. शिक्षणासोबत मूल्याची जोड महत्वाची आहे, असे प्रतिपादन शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन पुणेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी केले.
गुरूवारी जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळा मोहगाव तिल्ली येथे केंद्रस्तरीय आढावा सभेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जि.प. गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सी.एल. पुलकुंडवार होते. अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी उल्हास नरड, भारतीय जैन संघटनेचे राज्याध्यक्ष अमर गांधी, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनिष जैन, दीपक पारेख, महेश कोठारी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, विस्तार अधिकारी शशीकांत खोब्रागडे, मालाधारी, सरपंच सुरजलाल पटले, समन्वयक बाबासाहेब गीते उपस्थित होते.
डॉ. पुलकुंडवार म्हणाले, सन १९९७ सालापासून मुथ्था यांच्या कार्यास मी पाहतो आहे. गावातील माता-पालक यांनी विद्यार्थ्यांच्या संस्कार व मूल्यवर्धनासाठी जागरुक रहावे. चांगल्या वाईट गोष्टी विद्यार्थ्यांना समजाव्यात. शिक्षण, आरोग्य व पोषण हे महत्वाचे घटक आहेत. गोंदियात शिक्षणाधिकारी नरड यांच्या नेतृत्वात चांगले कार्य सुरू आहे. विद्यार्थ्यांचा संवाद वाढविण्यासाठी शिक्षकांनी पालकांशी जास्त संपर्कात रहावे. मनावर होणारे संस्कार चहूबाजूने होतात. यासाठी शिक्षकांचे आचार व विचार असावेत. मुले अनुकरणशील असतात. गुजरात, किल्लारी, जम्मू कश्मिर येथील निर्वासित शेकडो मुलांना मुथ्था फाऊंडेशनने आधार दिला व पालकत्व स्वीकारले, असे त्यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी आपल्या मार्गदर्शनात, मूल्ये ही शिकवता येत नाहीत तर ती प्रत्यक्ष कृतियुक्त सहभागाने रुजवावी लागतात. ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळांमुळे मुले अभिव्यक्त होत आहेत. दैनंदिन अध्यापनासोबत, मूल्यशिक्षण मिळाल्यास मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील व आदर्शवत पिढी निर्माण होईल. गोंदिया जिल्हा राज्याच्या तुलनेने टोकावर व मागासलेला आहे. अतिशय गरीब गावातील शाळांना फाऊंडेशनने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दरम्यान मोहगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत: रचलेल्या कवितांचे बालकाव्यसंग्रह ‘प्रयास’ नावाने प्रकाशित करण्यात आले. स्वागतपर भाषण मुख्याध्यापक यांनी केले. केंद्राचा आढावा केंद्रप्रमुख आर.आर. अगडे यांनी सादर केला. उपस्थित सर्व मान्यवरांनी वर्ग १ ते ३ ची पाहणी केली. विविध प्रश्न विचारुन मूल्यवर्धनाचा आढावा घेतला व समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास समूह साधन केंद्र मोहगाव (तिल्ली) अंतर्गत सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, सर्व शिक्षक, मोहगावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक वर्ग उपस्थित होते. संचालन पदविधर शिक्षक अशोक चेपटे यांनी केले. आभार विस्तार अधिकारी शशीकांत खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.एच. मेश्राम, एल.के. ठाकरे, एच.के. धपाडे, टी.पी. डावकरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)