शिक्षण मंडळ चूक दुरुस्त करणार
By Admin | Updated: October 12, 2014 23:30 IST2014-10-12T23:30:50+5:302014-10-12T23:30:50+5:30
महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा प्रकाशित इयत्ता अकरावी व बारावी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात प्रधानमंत्री या योग्य, शासनमान्य व संविधानिक शब्दाऐवजी

शिक्षण मंडळ चूक दुरुस्त करणार
भंडारा : महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारा प्रकाशित इयत्ता अकरावी व बारावी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात प्रधानमंत्री या योग्य, शासनमान्य व संविधानिक शब्दाऐवजी पंतप्रधान हे चुकीचे व असंवैधानिक शब्द छापल्याची चूक बहुजन प्रबोधन मंच लाखांदूरचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी निदर्शनास आणून देताच मंडळाने आपली सहमती पत्राद्वारे दर्शवून चूक दुरुस्ती करून शुद्धीपत्र काढत असल्याचे पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता अकरावीसाठी २०१२ मध्ये व बारावीसाठी २०१३ मध्ये राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचे प्रकाशन केले. अकरावीच्या पुस्तकात चार वेळा व बारावीच्या पुस्तकात एकशे बावीस वेळा पंतप्रधान शब्द छापलेला आहे. बप्रमंला अध्यक्षांनी आपल्या ३१ जुलै २०१४ च्या निवेदनातून मंडळाच्या निदर्शनास आणून दिले की, दि कान्स्टिट्युशन आॅफ इंडिया अनुच्छेद ७४ (१) व ७५ (१) मध्ये प्राईम मिनीस्टर शब्द आल्याने ते संविधानिक आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या शासन व्यवहार कोश २००० शासन व्यवहार शब्दावली (मराठी इंग्रजी) २००५ न्याय व्यवहार कोश २००८ मध्ये प्राईमचा अर्थ पंत नसून प्रधान आहे व मिनिस्टर चा अर्थ प्रधान नसून मंत्री आहे व प्राईम मिनिस्टरचा अर्थ पंतप्रधान शब्द नसून प्रधानमंत्री शब्द आहे. म्हणून पंतप्रधान या चुकीच्या शब्दाऐवजी प्रधानमंत्री हे योग्य शासनमान्य व संवैधानिक शब्द स्वीकारून त्वरीत शुद्धीपत्र छापून झालेली चूक दुरुस्त करण्याची मागणी केली होती. तसेच माहिती अधिकार अधिनियम २००५ चा वापर करून १९ सप्टेंबर २०१४ च्या पत्रातून आपल्या निवेदनानुसार (३१.७.२०१४) मंडळाने केलेल्या कार्यवाहीची माहिती मागितली होती. मंडळाने मागणीचे गांभीर्य ओळखून पत्राद्वारे कळविले की, बप्रमंच्या पत्राला उच्च माध्यमिक राज्यशास्त्र विषय अभ्यास मंडळाच्या सभेत अभिप्रायासाठी ठेवण्यात आले होते.
अभ्यास मंडळाच्या अभिप्रायानुसार इयत्ता ११ वी १२ वी राज्यशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकात पंतप्रधान ऐवजी प्रधानमंत्री असा बदल करण्यात येत आहे. तसेच मंडळाच्या शिक्षण संक्रमण अंकातून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना माहितीसाठी परिपत्रकान्वये कळविण्यात येत आहे. सचिवांनी पत्राचा मुळ मसूदा मान्य केला असल्याचा शिक्का मारून पत्राद्वारे कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)