सकाळपाळीतील शाळांना शिथिलता
By Admin | Updated: April 14, 2016 00:40 IST2016-04-14T00:40:37+5:302016-04-14T00:40:37+5:30
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने उन्हाचे असह्य चटके झोंबत आहे. अशात जिल्हा परिषदच्या सकाळपाळीतील शाळा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होत्या.

सकाळपाळीतील शाळांना शिथिलता
शिक्षण समितीच्या सभेत घेतला ठराव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पुढाकार
भंडारा : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्याने उन्हाचे असह्य चटके झोंबत आहे. अशात जिल्हा परिषदच्या सकाळपाळीतील शाळा दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होत्या. त्यामुळे उन्हापासून विद्यार्थ्यांचे रक्षण व्हावे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने आज बुधवारला झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत मुद्दा उपस्थित केला. शिक्षण समितीने तातडीने जिल्हा परिषदच्या सर्व शाळा सकाळी १० वाजेपर्यंत भरविण्याचा ठराव घेतला.
उन्हाळ्यात जिल्ह्यातील जिल्हा परिषद व सर्व खासगी शाळा सकाळपाळीत सुरू झालेल्या आहेत. मात्र, या शाळा दुपारी १२ वाजेपर्यंत भरविण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यामुळे दुपारी शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थी परिसरातील शाळेत शिक्षणाकरिता दोन ते तीन किमीवरून पायदळ किंवा मिळेल त्या साधनाने येत होते. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना घरी पोहचायला दुपारचे एक वाजायचे. त्यामुळे सध्याची रखरखत्या उन्हाची स्थिती बघता, याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर पडू नये, म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने हा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला त्याची कल्पना दिली. मात्र, त्यांनी यावर कुठलीही उपाययोजना केली नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने बुधवारला शिक्षण समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी हा मुद्दा रेटून धरला. यात त्यांचा मुद्दा संयुक्तिक असल्याने शिक्षण समितीने शाळा सकाळी १० वाजेपर्यंत राहील. त्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात येईल व शिक्षक सकाळी ११.३० वाजेपर्यंत शाळेत राहील असा ठराव घेतला.
ही सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती राजेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षण समिती सचिव तथा शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व शिक्षण प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान मुबारक सय्यद यांनी, आंतरजिल्हा बदलीचा मुद्दा उपस्थित केला. यात आंतरजिल्हा बदलीसाठी जेवढे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे आले आहे. त्या सर्व प्रस्तावाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावा असा ठराव घेण्यात आला. त्यामुळे आता आंतरजिल्हा बदलीसाठी रखडलेले सर्व प्रस्ताव निकाली निघेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
यावेळी सभेत जिल्ह्यातील सर्व शाळांच्या संच मान्यतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संचमान्यतेचा तिढा येत्या दोन ते तीन दिवसात मार्गी लावण्यात येणार असून त्यानंतर शिक्षकांचे रोस्टर अद्ययावत करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच शिक्षण सेवकांची डीसीपीएसच्या नावाखाली प्रति महिना एक हजार रूपये कपात करण्यात येते. डीसीपीएसच्या रकमेचा हिशोबात मोठा घोळ झाला असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ही रक्कम व्याजासह परत करावी, अशी मागणी मुबारक सय्यद यांनी केली. यावेळी सभापती डोंगरे व शिक्षणाधिकारी शेंडे यांनी, सदर रक्कम पुढील महिन्यापासून कपात करण्यात येणार नसल्याची माहिती दिली. या सभेत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यातील अनेक विषय तातडीने सोडविण्याची हमी शिक्षणाधिकारी किसन शेंडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुढाकारातून अनेक प्रलंबीत प्रश्न मार्गी लागले. (शहर प्रतिनिधी)