मोहाडीत भीषण पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:46 IST2016-04-15T00:46:24+5:302016-04-15T00:46:24+5:30
एप्रिलचा महिना सुरु होताच मोहाडीत पिण्याच्या पाण्याासाठी महिलांची भटकंती सुरु झालेली आहे. नळाला एक दिवसाआड चार पाच गुंड पाणी मिळत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

मोहाडीत भीषण पाणी टंचाई
सूर नदी कोरडी : एक दिवसाआड नळाला पाणी
सिराज शेख मोहाडी
एप्रिलचा महिना सुरु होताच मोहाडीत पिण्याच्या पाण्याासाठी महिलांची भटकंती सुरु झालेली आहे. नळाला एक दिवसाआड चार पाच गुंड पाणी मिळत असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. मे आणि जून महिना शिल्लक असल्याने पुढे कसे होईल? अशी चिंता नागरिकांना भेडसावत आहे. आठ दिवसात टँकरची व्यवस्था केली नाही तर नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा राजेंद्र वॉर्डातील महिलांनी दिला आहे.
मोहाडीची नळयोजना १९७१ ला कार्यान्वित झाली. ४५ वर्षे झाल्याने ही नळयोजना कालबाह्य झाली आहे. मोहाडी शहरातील सर्वच विहिरी या फ्लोराईडयुक्त खारट पाण्याच्या असल्याने ते पिण्यायोग्य नाही. म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिक नळाच्या पाण्यावर अवलंबून असतात. मोहाडीतील नळयोजना सूरनदीच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि सूर नदी कोरडी पडलेली आहे. शहरातील काही विहिरींची पाण्याची पातळीही खोल खोल गेलेली आहे. बाहेरच्या वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी सकाळपासूनच महिलांची गर्दी विहिर, हातपंपावर बघावयास मिळत असून पाण्यासाठी भांडण, तंटे, सुद्धा होत आहेत. जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. याबाबत नगरपंचायतला विचारल्यावर जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीची जाणीव करून दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी आता पाण्यासाठी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न पडला आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असले तरी प्रशासन सुस्त आहे.