रेतीघाटांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

By Admin | Updated: December 10, 2015 00:42 IST2015-12-10T00:42:20+5:302015-12-10T00:42:20+5:30

नदीत वाहणाऱ्या पाण्यासोबत वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची रेती वाहून येते.

Due to the sand densities, the existence of the river is in danger | रेतीघाटांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

रेतीघाटांमुळे नदीचे अस्तित्व धोक्यात

नदीपात्रात रेती नसतानाही रेती घाटांचा लिलाव
मोहन भोयर तुमसर
नदीत वाहणाऱ्या पाण्यासोबत वैनगंगा व बावनथडी नदीपात्रात उच्च दर्जाची रेती वाहून येते. परंतु, मागील सात वर्षापासून रेती वाहून येण्याचे प्रमाण कमी होत आहे. याउलट रेतीचा प्रचंड उपसा सुरू असल्यामुळे नदीपात्रात रेतीच नसल्याचे चित्र आहे. रेतीघाटांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून वैनगंगा व बावनथडी नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

वैनगंगा व बावनथडी या दोन नद्या तुमसर तालुक्यातून वाहतात. मध्यप्रदेशातून त्यांचा उगम होतो. बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. पाण्याचा प्रवाहासोबतच रेतीसाठा नदीपात्रात जमा होतो. शेकडो वर्षापासून ही निरंतर प्रक्रिया सुरू आहे. बावनथडी नदीवर बावनथडी सिंचन प्रकल्प तयार झाला. वैनगंगा नदीवर वाहनी-मांडवी येथे ४५० कोटींचा बॅरेज तयार करण्यात आला. येथून धापेवाडा सिंचन प्रकल्प व अदानी वीज उद्योगाला पाणी देण्यात येते.
याकरिता पाणी अडविण्यात येते. बॅरेजनंतर पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. या प्रवाहासोबत पावसाळ्या व्यतिरिक्त रेतीचा प्रवाह येणे बंद झाल्याचे चित्र आहे.
सध्या या दोन्ही नद्यांच्या पात्रात खडकाळ रेती तेवढी शिल्लक आहे. काही ठिकाणी मातीमिश्रीत रेती आहे. एकेकाळी पांढऱ्या शुभ्र चकाकणाऱ्या रेतीचा साठा येथील नदीपात्रात होता. महसूलाचे उद्दिष्ट गाठण्याच्या स्पर्धेत महसूल विभागाने या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
दरवर्षी नित्याने रेतीघाटांचा लिलाव करण्यात येतो. कोट्यवधींची बोली लागते. त्यामुळे रेतीचा प्रचंड उपसा होत असतो. रेती उपशाचे कठोर नियम असले तरी २४ तास निगराणी ठेवणे महसूल प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे रेती तस्करांचे चांगलेच फावत आहे.
सन २०१५ मध्ये तुमसर तालुक्यातील सुकळी रेतीघाट ६९.६९ लाख, चारगाव ६७.५५ लाख, बाम्हणी ८५.५० लाख, देवनारा ११.७२ लाख, तामसवाडी ८५ लाख, लोभी २०.६० लाख, वारपिंडकेपार २८ लाख, आष्टी ३५ लाख ४ कोटी ३ लाख ९ हजार ६१ रुपयांचा लिलाव झाला.
याव्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्यात ५ रेतीघाट ५ कोटी ४१ लाख, ६९ हजार, मोहाडी तालुक्यात ६ रेतीघाट ३ कोटी ८२ लाख, साकोली तालुक्यात ४ रेतीघाट ३१ लाख ९५ हजार, लाखनी तालुक्यात ४ रेतीघाट ४७ लाख ३६ हजार, लाखांदूर तालुक्यात २ रेतीघाट १ कोटी २७ लाख, भंडारा टाकळी रेतीघाट १ कोटी ५९ लाख एकूण २९ रेती घाटातून १६ कोटी ९२ लाख ६१ हजार ५५८ रूपयांचा महसूल राज्य शासनाला मिळाला होता.
यावर्षी महसूल विभागाने रेतीघाट लिलाव प्रक्रियेला मान्यता दिली असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. तुमसर तालुक्यात किमान ५ ते ६ कि़मी. वर एक रेतीघाटाच्या लिलावाला मान्यता देण्यात आली आहे.
भुजल सर्व्हेक्षण विभाग, जिल्हा खनिकर्म विभाग, महसूल विभाग रेतीघाटांना अंतिम मान्यता देते. तुमसर तालुक्यात महसूल प्रशासनाने गौण खनिजांकरिता १३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. वाजवीपेक्षा जास्त उद्दिष्ट येथे देण्यात आले, असे दिसून येते.


रेतीघाट लिलावाकरिता पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्राची गरज असते. जिल्हा खनीकर्म विभाग तथा पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत शासन रेतीघाटाचे लिलाव प्रक्रिया पूर्ण करीत असते. जिल्ह्यातील रेतीघाटांचा लिलाव हा शासकीय नियमानुसारच अनेक बिंदूचा विचार केल्यानंतरच केल्या जातो. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील रेंगेपार (पांजरा) रेतीघाट लिलाव करण्यात आला आहे.
- डी.टी. सोनवाने
तहसीलदार, तुमसर.

Web Title: Due to the sand densities, the existence of the river is in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.