चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १० विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: March 10, 2016 00:49 IST2016-03-10T00:49:37+5:302016-03-10T00:49:37+5:30
जांभोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली.

चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्याने १० विद्यार्थ्यांना विषबाधा
जांभोरा (टोली) येथील प्रकार : रुग्णालयात उपचार सुरु
करडी (पालोरा) : जांभोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १० विद्यार्थ्यांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्या. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यातील तीन विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार बुधवारी घडला.
नेहा चांदेकर (१०), कुणाल कवरे (९), समीर मेश्राम (१०), ज्ञानेश्वरी राऊत (९), रंजिता वाघाडे (८), करण खंगार (८), अश्विनी राऊत (९), सुनील राऊत (१०), अभय राऊत (८), गौरव धोंडे (९) असे दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
शालेय विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास नीट करता यावा यासाठी सहाय्यक शिक्षक कमलेश दुपारे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या बिया आणण्याचे सांगितले. त्यानुसार विद्यार्थ्यांनी मिळेल त्या बिया वर्गात आणल्या. दरम्यान, इयत्ता दुसरीचा विद्यार्थी अभय राऊत याने वेगळ्या प्रकारची बी दिसत असल्याने ती खाल्ली. दरम्यान अन्य मुलांनीही त्या बिया खाण्यास सुरुवात केली. दुपारच्या जेवणापूर्वी विद्यार्थ्यांना चक्कर आली तर काहींनी उलट्या केल्या. त्यामुळे शिक्षक दुपारे यांनी विद्यार्थ्यांना करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
दरम्यान नेहा चांदेकर, कुणाल कवरे, करण खंगार या विद्यार्थ्यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित सात मुलांवर औषधोपचार करून सुटी देण्यात आली. (वार्ताहर)