कोरडा पडलेला देवरी गोंदी तलाव झाला जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:57 IST2019-06-05T00:57:11+5:302019-06-05T00:57:45+5:30

अनेक वर्षांपासून कोरडा पडलेला तलाव जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलमय झाला असून लाखनी तालुक्यातील देवरी गोंदी तलावावर सध्या पशुपक्षांचा मुक्त संचार आहे. निसर्ग प्रेमीही सुखावले आहेत. १६.८० हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या तलावात सध्या ७२ टीसीएम पाणीसाठा आहे.

Dryed Gori Gondi lake is soaked | कोरडा पडलेला देवरी गोंदी तलाव झाला जलमय

कोरडा पडलेला देवरी गोंदी तलाव झाला जलमय

ठळक मुद्देजलयुक्त शिवारची किमया : ७२ टीसीएम पाणीसाठा, उन्हाळ्यात पशुपक्षांना ठरला आधार

मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : अनेक वर्षांपासून कोरडा पडलेला तलाव जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलमय झाला असून लाखनी तालुक्यातील देवरी गोंदी तलावावर सध्या पशुपक्षांचा मुक्त संचार आहे. निसर्ग प्रेमीही सुखावले आहेत. १६.८० हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या या तलावात सध्या ७२ टीसीएम पाणीसाठा आहे.
देवरी गोंदी तलाव जंगलाच्या पायथ्याशी आहे. जंगलातील पावसाळ्याचे पाणी नैसर्गीकरित्या या तलावात साचते. ही दुरदृष्टी ठेवून तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात आली होती. तलावात अथांग पाणी साचलेले रहायचे. मात्र कालव्याच्या सदोश बांधकामामुळे पाणी शेतापर्यंत पोहचत नव्हते. अतिवृष्टीत कालव्याची पाळ वाहून गेली होती. त्यामुळे तलाव कोरडा पडला. लाखो रूपयांचा खर्च वाया गेला.
या तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आमदार बाळा काशिवार यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाशीही संपर्क साधण्यात आला. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्यासह अधिकारी तलावावर पोहचले. संपूर्ण दोन कि़मी. चा परिसर फिरून पाहणी करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील मोरेश्वर प्रधान, रा.शी. प्रधान व गावकरी उपस्थित होते.
यानंतर या तलावाच्या पुर्नजीवनाचे काम जलयुक्त शिवार आणि खनिज विकास निधीतून करण्यात आले. पाहता पाहता या तलावाचे काम पूर्ण झाले. आता या तलावात मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे परिसरातील भुजलातही वाढ झाली आहे. जंगलातील पशुपक्षांची तहाण हा तलाव भागवित आहे. जलाशयावर दररोज पशुपक्षांची मोठी गर्दी होते.

८४ हेक्टर शेतीसिंचन
देवरी गोंदी तलावामुळे ८४ हेक्टर शेतजमीन सिंंचनाखाली येणार आहे. कालव्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून काम उत्कृष्ठ दर्जाचे व्हावे, यासाठी गावकरी लक्ष ठेवनू आहे. येत्या पावसाळ्यात तलाव तुडूंब भरल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळेल, साकोली लघु पाटबंधारे विकाचे जलसंधारण अधिकारी सुशांत गडकरी यांनी सांगितले.

तलावाच्या भिंतीची उंची ८ मीटर असून १०४ मीटर लांबी आहे. ३९० टीसीएम पाण्याची साठवणूक क्षमता आहे. सध्या ८२ टीएमसी पाणी या तलावात आहे. जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे निधीची तरतूद झाली.
-एस.एन. राऊत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, साकोली.

Web Title: Dryed Gori Gondi lake is soaked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.