जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:46+5:30
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ११८८.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सध्या या कालावधीत ११४९.४ मिमी म्हणजे ९७ टक्के पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात १३६ टक्के झाला. या तालुक्याची सरासरी १२२७ मिमी असून १ जून ते १८ सप्टेंबर पर्यंत १०७९.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो.

जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे संकट गडद झाले आहे. शेतामध्ये पाणी साचल्याने धानपीक सडण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्वाधिक पाऊस पवनी आणि लाखांदूर तालुक्यात झाल्याने या तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. प्रशासनानकडून अद्यापही अतिवृष्टीच्या नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला नाही. गत काही वर्षांपासून कोरड्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा ओल्या दुष्काळाचे संकट आले आहे.
भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे संकट आले होते. भातपीक रोवणीच्या वेळेसच धोक्यात आले होते. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सतत १५ दिवस जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळला. यामुळे जिल्ह्यावर आता ओल्या दुष्काळाचे सावट आले आहे. सर्वाधिक पाऊस लाखांदूर, लाखनी, पवनी तालुक्यात झाला. या तालुक्यातील भाताच्या बांध्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे धानपीक सडण्याची भीती निर्माण झाली आहे.
भंडारा जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. १ जून ते १८ सप्टेंबर या कालावधीत ११८८.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सध्या या कालावधीत ११४९.४ मिमी म्हणजे ९७ टक्के पाऊस कोसळला आहे. सर्वाधिक पाऊस पवनी तालुक्यात १३६ टक्के झाला. या तालुक्याची सरासरी १२२७ मिमी असून १ जून ते १८ सप्टेंबर पर्यंत १०७९.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. सध्या या तालुक्यात १४७३.५ मिमी पावसाची नोंद झाली. लाखांदूर तालुक्यात १३१४.२ मिमी आणि लाखनी तालुक्यात १३५७.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या तीनही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून पीक परिस्थिती धोक्यात आली आहे. शेतकºयांवर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. विविध सामाजिक संघटनांनी ओला दुष्काळ घोषीत करावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी सततच्या संकटांनी त्रस्त झाले आहेत. गत काही वर्षापासून जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडत आहे. सुरुवातीला कोरड्या दुष्काळाची चिन्हे असताना आता ओला दुष्काळ निर्माण झाला आहे.
सप्टेंबरमधील पावसाने पिकांचे नुकसान
भंडारा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून धोधो पाऊस कोसळला. वर्षभराचा पाऊस जणू या १५ दिवसातच कोसळल्याचे दिसत आहे. अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. नदीतिरावरील शेतींना पुराचा मोठा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पिकासह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. प्रशासनाच्या वतीने अद्यापही सर्वेक्षणाला प्रारंभ झाला नाही. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता नाही. शेतकरी शेतात जाऊन पाहतात तर उद्ध्वस्त झालेले शेत दिसून येते. १५ दिवसांपासून धानाच्या बांधीमध्ये पाणी साचल्याने धानपीक सडत असल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसाने फुलोºयावर आलेल्या हलक्या धानाचेही नुकसान होत असल्याचे शेतकºयांनी सांगितले.