पहाटेपासूनच वाहतूक पोलीस पाळतीवर !
By Admin | Updated: May 13, 2015 00:46 IST2015-05-13T00:46:31+5:302015-05-13T00:46:31+5:30
लग्न समारंभासाठी वऱ्हाड्यांना वाहनात खचाखच कोंबून नेताना पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनधारक बहुतांश वेळा आडमार्गाचा वापर करतात.

पहाटेपासूनच वाहतूक पोलीस पाळतीवर !
प्रशांत देसाई भंडारा
लग्न समारंभासाठी वऱ्हाड्यांना वाहनात खचाखच कोंबून नेताना पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी वाहनधारक बहुतांश वेळा आडमार्गाचा वापर करतात. नेमक्या याच मार्गावर हे वाहतूक (वसुली) शिपाई भल्या पहाटेपासूनच अशा वाहनाच्या (सावजाच्या) प्रतीक्षेत असतात. या वाहनांना लक्ष्य करून त्यांची आडमार्गावर चालानच्या नावावर वाहतूक शिपायांकडून ‘लूट’ सुरु असल्याचे वास्तव मंगळवारला (दि.१२) सकाळी ‘लोकमत’ने ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन उघडकीस आणले.
मे महिना हा लग्नसराईचा महिना आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विवाह उरकविण्यावर वधूवरांकडील मंडळींचा भर असतो. त्यादृष्टीने विवाह मुहूर्ताचा दिवस ठरवून वऱ्हाड्यांना समारंभासाठी नेण्यासाठी वाहनांची जमवाजमव करतात. विवाहाचे दिवस असल्याने ज्यांचे विवाह जुळले आहेत. ते भावी जीवनाचे स्वप्न रंगवित असतानाच वाहतूक शिपाई हेसुद्धा स्वप्नवत जीवन जगण्यसाठी आटापिटा करीत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा जिल्ह्याच्या सीमालगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतर्गत रस्त्यांना जोडलेल्या आहेत. भंडारा शहरातून राष्ट्रीय तसेच आंतरराज्यीय मार्ग गेले आहेत. त्यामुळे येथून दररोज शेकडो वाहने धावतात. अनेकदा वाहतूक शिपायांचा ससेमिरा लागतो यासाठी वाहनधारक आडमार्गाचा अवलंब करतात. विवाहाची रेलचेल सुरु असून क्षमतेपेक्षा जास्त वऱ्हाड्यांना बसवून समारंभासाठी नेत असतात. अशा वाहनांवर वाहतूक शिपाई ‘नजर’ ठेवून असतात. वाहनधारक पोलिसांच्या कारवाईतून वाचण्यासाठी ज्या आडमार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. अशाच आडमार्गावर वाहतूक पोलीस त्यांच्या शोधात असतात.
वाहतूक शिपायांच्या कर्तव्याची वेळ सकाळी ७ वाजतापासून सुरू होते. मात्र, एरव्ही लग्नसराई असल्यामुळे वऱ्हाड्यांचे वाहनही भल्या पहाटेच निघत असतात. नेमके हे लक्षात ठेवून अशा वाहनांना पकडणे आणि चालानचा धाक दाखवून ‘खिसे’ गरम करता यावे यासाठी वाहतूक शिपाई पहाटेच आडमार्गावर लग्नाच्या वाहनांची वाट बघत असतात.
याबाबत मंगळवारला सकाळी ‘लोकमत’च्या सदर प्रतिनिधीने शहरातील व लगतच्या मार्गावर ‘स्टिंग आॅपरेशन’ करण्यासाठी फेरफटका मारला असता, वाहतूक शिपायांच्या ‘लक्ष्मी’ दर्शनाचा प्रकार कॅमेरात कैद करता आला. शहरातील काही चौकात सकाळी ८ वाजता वाहतूक शिपाई कर्तव्यावर हजर झालेत तर काहींचा नऊपर्यंत पत्ता नव्हता.
पवनी मार्गावर असलेल्या कारधा टोलनाका परिसरातील वीज वितरण कार्यालयालगत वाहतूक विभागाचा एक कनिष्ठ अधिकारी, एक वाहतूक शिपाई उभे होते. यावेळी पवनीकडून एचआर ५५ / ई ७४३५ क्रमांकाचा एका कंटेनर जात होता. त्यात क्षमतेपेक्षा जास्त केबल वायर व लोखंडी साहित्य होते. कंटेनरला त्या पोलीस अधिकाऱ्याने थांबविले. व स्वत:च तो चालकाकडे गेला. तेवढ्याच तत्परतेने वाहन चालकाने ‘त्या’ अधिकाऱ्याला पैसे दिले. पैसे मिळताच त्याने जाण्यासाठी सांगितले. हा प्रकार टिपत असताना ते दोन्ही पोलीस सदर प्रतिनिधीजवळ आले. का करीत आहात असे विचारले. त्यावर सदर प्रतिनिधीने तुम्हीच आमच्याजवळ आले, असे ठणकावून सांगताच त्यांनी काढता पाय घेतला.
वाहन चालान करण्याचे अधिकार कुणाला?
रस्त्यावरुन धावणाऱ्या जडवाहतूक वाहनाची वहनक्षमता किती? याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कागदपत्रांची तपासणी करून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. परंतु, वाहतूक शिपायांना याची जाणिव असूनही केवळ चालानचा धाक दाखवून असा प्रकार करीत असतात. एखाद्या वाहनाबाबत शंका असल्यास शिपाई वाहनांचे कागदपत्र व वाहन ताब्यात घेऊन वाहन पोलीस ठाण्यात जमा करुन त्याची माहिती आरटीओंना देऊ शकतो. परंतु येथे वाहतूक शिपायांकडून वाहनधारकांना कायदा माहीत नसल्यामुळे वाहनधारकांची लूट सुरु आहे.
वरिष्ठांनाही पोहचविली जाते रसद!
भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असल्यामुळे येथून दररोज वाहतुकीची वर्दळ असते. अनेकदा क्षमतेपेक्षा जास्त साहित्य भरून वाहतूक होत असल्यामुळे अशा वाहनांवर ‘लक्ष्य’ असते. अशा वाहन चालकांकडून तगडी कमाई होत असल्यामुळे काही वाहतूक शिपाई अधिकाऱ्यांची मर्जी सांभाळण्याचे काम करीत आहेत. येथे तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मर्जी सांभाळण्यासाठी नागपूरहून आलेला एक ‘मूकबीर’ कोणत्या वाहतूक पोलिसाला कोणते ठिकाण ड्युटीसाठी द्यायचे हे ठरवित असल्याचे शहर वाहतूक शाखेतीलच विश्वसनीय सूत्राने ‘लोकमत’ला सांगितले.