रेल्वेप्रवास नको रे बाबा; तिकीट काढणे सोडा रद्द करायलाही कुणी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 05:00 AM2021-04-22T05:00:00+5:302021-04-22T05:00:43+5:30

भंडारारोड रेल्वेस्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होते. लाॅकडाऊनच्या पूर्वी ४६ प्रवासी गाड्या नियमित धावायच्या. मात्र पहिल्या लाॅकडाऊननंतर सर्व प्रवासी गाड्या ठप्प झाल्या होत्या. अनलाॅकमध्ये रेल्वेची चाके धावू लागली. परंतु प्रवासी सावधगिरी घेताना दिसत होते. आता संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.

Don't travel by train, Baba; No one turned to cancel the ticket | रेल्वेप्रवास नको रे बाबा; तिकीट काढणे सोडा रद्द करायलाही कुणी फिरकेना

रेल्वेप्रवास नको रे बाबा; तिकीट काढणे सोडा रद्द करायलाही कुणी फिरकेना

Next
ठळक मुद्देभंडारारोड रेल्वेस्थानकावर शुकशुकाट : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांनीच धास्ती

तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : भंडारारोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावर पूर्णत: शुकशुकाट असून, तिकीट काढायला तर सोडा रद्द करायलाही कुणी येत नसल्याची स्थिती आहे. मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये शुकशुकाट असतो तर मुंबईहून येणारी विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसून येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वांनीच धास्ती घेतल्याचे दिसून येते.
भंडारारोड रेल्वेस्थानकावरून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ये-जा होते. लाॅकडाऊनच्या पूर्वी ४६ प्रवासी गाड्या नियमित धावायच्या. मात्र पहिल्या लाॅकडाऊननंतर सर्व प्रवासी गाड्या ठप्प झाल्या होत्या. अनलाॅकमध्ये रेल्वेची चाके धावू लागली. परंतु प्रवासी सावधगिरी घेताना दिसत होते. आता संपूर्ण राज्यात कोरोनाचे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रत्येक जण बाहेरगावी जाणे टाळत आहे. भंडारा रोड रेल्वेस्थानकावर सर्वत्र शुकशुकाट दिसून येतो. काही मोजके प्रवासीच प्रवास करताना दिसून येतात. रेल्वे काउंटरवर दिवसातून एक ते दोनजण तिकीट काढण्यासाठी येतात. तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्याही नगण्य असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईवरून येणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मोठी गर्दी
मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. बुधवारी सकाळी महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणेमार्गे कोल्हापूरकडे गेली. २२ डब्यांच्या या रेल्वेत मोजकेच प्रवासी दिसून आले. नेहमी प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जाणारी विदर्भ एक्स्प्रेसचीही अशीच स्थिती आहे. नाममात्र प्रवासी या रेल्वेत दिसून येतात. याउलट मुंबईहून येणारी विदर्भ एक्स्प्रेस प्रवाशांच्या गर्दीने भरलेली दिसून येते. लाॅकडाऊन लागण्याच्या भीतीने मोठ्या प्रमाणात कामकार आणि नोकरदार आपल्या गावाकडे परतत असल्याचे चित्र दिसत आहे. यासोबतच इतरही प्रवासी रेल्वेची अशीच अवस्था आहे. रेल्वे सुरू, पण प्रवासी दिसणे दुर्लभ अशी अवस्था सध्या भंडारारोड रेल्वेस्थानकाची झाली आहे.

भंडारारोड रेल्वेस्थानकावरुन पूर्वीप्रमाणे प्रवासी रेल्वे धावत आहेत. परंतु प्रवाशांची संख्या कमी आहे. अनेक प्रवासी रेल्वेचे डबे रिकामे दिसतात. तिकीट काउंटर सुनसान असून दिवसभरात एक-दोन प्रवाशांव्यतिरिक्त कुणीही येताना दिसत नाही. तिकीट विक्री कमी झाली असून, तिकीट रद्द करणाऱ्यांचीही गर्दी दिसत नाही. 
-मेघराय मुरुमु, स्टेशन मास्तर, भंडारारोड, रेल्वेस्थानक

३०० ऑटोरिक्षाची चाके थांबली, हाॅटेल ठप्प
भंडारारोड रेल्वेस्थानकाबाहेर सुमारे ३०० ऑटोरिक्षा प्रवाशांची ने-आण करायचे. वरठी येथे रेल्वेस्टेशन असून, भंडारा येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. १० किमी अंतरासाठी सर्वसामान्य प्रवासी ऑटोरिक्षालाच पसंती देतात. मात्र आता प्रवासीच नसल्याने ऑटोरिक्षाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. ३०० कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहिल्या लाॅकडाऊनमध्ये सावरत नाही तोच आता दुसरा फटका बसत आहे. वरठी स्टेशनबाहेर असणारा हाॅटेल व्यवसायही ठप्प झाला असून, चहा टपरी, पानठेले ओस पडली आहेत.

 

Web Title: Don't travel by train, Baba; No one turned to cancel the ticket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.