दारूने केला घात, बापलेकाचा करुण अंत
By Admin | Updated: May 8, 2014 01:17 IST2014-05-08T01:17:59+5:302014-05-08T01:17:59+5:30
पक्षी मारण्यासाठी आणलेल्या विषारी औषधांच्या प्याल्यातून मद्यप्राशन केल्याने बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथील हनुमान वॉर्डात घडली.

दारूने केला घात, बापलेकाचा करुण अंत
वरठी : पक्षी मारण्यासाठी आणलेल्या विषारी औषधांच्या प्याल्यातून मद्यप्राशन केल्याने बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथील हनुमान वॉर्डात घडली. रामकृष्ण इलमे (६५) व सेवक इलमे (३३) अशी मृत बापलेकांची नावे आहेत.
येथील हनुमान वॉर्डातील रामकृष्ण इलमे हे कुटुंबासह राहतात. त्यांना पत्नी व दोन मुले आहेत. मिळेल ती कामे करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पत्नी सुशीला व त्यांची स्नुषा हे रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होते. लहान मुलगा गावातीलच एका राईस मिलमध्ये मजुरीवर जात होता.
रामकृष्ण इलमे व त्यांचा मोठा मुलगा सेवक हे जंगलातील पक्षी मारण्याचे काम करीत होते. पक्षी मारण्यासाठी ते विषारी औषधांचा वापर करीत होते.
घटनेच्या दिवशी सेवकने बाजारातून मासोळी विकत आणली होती. दारु पिण्याची सवय असल्यामुळे त्यांनी वडिलाने गावातून दारु विकत आणण्यासाठी सेवकला पाठविले. सेवकने अंधारातच घरी पक्षी मारण्यासाठी असलेल्या विचारी औषधाची रिकामी शिशी घेऊन गेला आणि त्यात दारु आणली. त्यावेळी गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. दारु पिण्याच्या गडबडीत या दोघांनी विषारी बाटलीतील दारु प्राशन केली.
दारु पिताच दोघांनाही वांत्या सुरू झाल्या. त्यांना तातडीने वरठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्यामुळे दोघांनाही भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
उपचारादरम्यान, दोघांचाही मृत्यू झाला. बापलेकांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे वरठी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
रामकृष्ण इलमे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असून सेवक यांच्यामागे पत्नी व ७ वर्षाची मुलगी आहे. घरात हलाखीची परिस्थिती असताना कमावते पुरुष निघून गेल्याने ईलमे कुटुंबावर संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, ग्रामपंचायत सदस्य थारनोद डाकरे, वामन थोटे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. वैद्यकीय अहवालानुसार विष प्राशनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वरठी पोलिसांनी र्मग दाखल केला असून तपास सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम गभने, दुर्योधन भुरे करीत आहेत. (वार्ताहर)