केरळ प्रकरणात सहनशीलतेचा अंत बघू नका
By Admin | Updated: March 4, 2017 00:28 IST2017-03-04T00:28:03+5:302017-03-04T00:28:03+5:30
विचारसरणी मान्य नसली तरी इतरांचे अस्तित्व मान्य करणारी आमची संस्कृती नाही. त्यामुळे कुणाच्याही जीवावर उठून संपविण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही.

केरळ प्रकरणात सहनशीलतेचा अंत बघू नका
हिंदू रक्षा मंचचा पुढाकार : केरळ हत्या निषेध सभेत संघटना पदाधिकाऱ्यांचा इशारा
भंडारा : विचारसरणी मान्य नसली तरी इतरांचे अस्तित्व मान्य करणारी आमची संस्कृती नाही. त्यामुळे कुणाच्याही जीवावर उठून संपविण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. मात्र सध्या केरळ राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेले हल्ले आणि हत्या विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. राज्य शासनाच्या पाठबळामुळे होत असलेल्या हल्यामुळे आता संयम संपत असून हे प्र्रकार न थांबल्यास आम्हीही शांततेचा त्याग करून चोख उत्तर देऊ शकतो, असा इशारा विविध पक्ष आणि संघटनेच्या नेत्यांनी आज येथे आयोजित निषेध सभेत दिला.
केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि भाजपाचे कार्यकर्ते यांच्या होत असलेल्या हत्या आणि प्राणघातक हल्याचा निषेध करण्यासाठी २ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात हिंदू रक्षामंच भंडाराच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अशा हल्यांमध्ये ठार झालेल्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांना दोन मिनीटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
केरळात वाढत असलेल्या संघ आणि भाजपा विचारांचे प्राबल्य विद्यमान कम्युनिस्टांना मान्य नाही. कुणीही प्रतिस्पर्धी तयार होऊ नये, या मानसिकतेच्या असलेल्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याकडून आज संघ आणि भाजपाच्या लोकांवर हल्ले करून जीवे मारले जात आहे. विचारांचे स्वातंत्र सर्वांना आहे. त्यामुळे आम्ही इतरांचे विचार दाबण्यात स्वारस्य मान नाही. परंतू कम्युनिस्टांकडून हेच केले जात आहे. संघ आणि भाजपाचे वाढत असलेली वैचारिक ताकद दाबवण्यासाठी जीव घेतले जात आहे.
केरळ राज्याचे मुख्यमंत्री येत असलेल्या कन्नूर जिल्ह्यातच हत्यांचे सत्र सातत्याने सुरू असल्याने खुद्द मुख्यमंत्र्यांचे याला समर्थन असल्याचा आरोप करीत कम्युनिस्टांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शनातून दिला. यावेळी भाकपचा झेंडा जाळून निषेध करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले.
हत्यासत्र थांबावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रपती राजवट केरळात लागू करावी आणि सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सुनिल मेंढे, हिंदू रक्षा मंचाचे संयोजक बंडू बारापात्रे, सुधीर धकाते, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय एकापुरे, महामंत्री अनिल नायर, राष्ट्र सेविका समितीच्या कार्यवाहीका स्रेहल खानापूरकर, स्वाती पांडे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख, चैतन्य उमाळकर, जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जि.प. सदस्य अरविंद भालाधरे, पं.स. सभापती प्रल्हाद भुरे, विनोद बांते, चंद्रशेखर रोकडे, संजय कुंभलकर, नगरसेवक आशु गोंडाणे, मंगेश वंजारी, नितीन धकाते, बंटी मिश्रा, मिलिंद मदनकर, मयुर बिसेन, राजकुमार कृपाण, अमृत पटेल, अजय ब्राम्हणकर, अविनाश ब्राम्हणकर, तिलक वैद्य, राहूल चौव्हाण, प्रशांत कावरे, राजेंद्र दोनाडकर, रोहित भोंगाडे, रमेश मंत्री, डॉ. गौरव भांगे, रामभाऊ फडके, हेमंत आंबेकर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.