The district receives 90 percent rainfall so far | जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस

जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस

ठळक मुद्देचांगल्या उत्पादनाची आशा : धानपिकावर कीडींचा प्रादूर्भाव कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी हुलकावणी देणाऱ्या वरुण राजाने मात्र यावर्षी जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या मान्सून सत्रात आतापर्यंत ९६ टक्के पाऊस बरसला आहे. विशेष म्हणजे धानाला भरपूर पाण्याची गरज असल्यामुळे धानाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सरासरी १३३० मिलीमीटर पाऊस बरसतो, असे गृहीत धरले जाते. मागील वर्षी म्हणजेच २०१८ च्या मान्सून सत्रात १ जून ते १० आॅक्टोबर पर्यंत सरासरी १००७ मिलीमीटर पाऊस बरसला होता. मात्र यावर्षी याच तारखेपर्यंत एकुण १२८२ मिलीमीटर पाऊस बरसला आहे. यात सर्वाधिक पावसाची नोंद पवनी तालुक्यात करण्यात आली आहे.
तालुकानिहाय बरसलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यात ११२१ मिलीमीटर, मोहाडी तालुक्यात १०७६.७ मिलीमीटर, तुमसर तालुक्यात १०४६.५ मिलीमीटर, पवनी तालुक्यात १५४५.९ मिलीमीटर, साकोली तालुक्यात १२०० मिलीमीटर, लाखांदूर तालुक्यात १५०७ तर लाखनी तालुक्यात १४७६ मिलीमीटर पाऊस बरसल्याची नोंद करण्यात आली आहे. या सर्वांची एकुण सरासरी १२८२.१ मिलीमीटर अशी नोंद करण्यात आली आहे.
यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्याची जीवनदायीनी नदी समजल्या जाणाऱ्या वैनगंगेला दोन वेळा पूर आला. विशेष म्हणजे मध्यप्रदेश व वैनगंगेच्या नदीखोऱ्यात मुसळधार पावसामुळे धरणाची दारे उघडण्यात आली होती. परिणामी जिल्ह्यातील नदीकाठावरील ८२ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे जीर्ण इमारतीही कोसळल्याची घटना घडली. तर मोठ्या प्रमाणात घर तथा जनावरांचे गोठेही कोसळल्याची घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे या पुरात आठ जणांना जीव गमवावा लागला होता.

किडीचे व्यवस्थापन आवश्यक
जिल्ह्यात दमदार पाऊस बरसल्याने धानपिकाचे चांगले उत्पादन होईल अशी आशा शेतकरी बाळगून आहेत. मात्र गत १५ दिवसांपासून धानपिकांवर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. परिणामी या किडीमुळे धानाचे उत्पादन घटणार तर नाही ना अशी भीती सुद्धा व्यक्त केली जात आहे. तुडतुडा या रोगाचे प्रमाण जास्त प्रमाणात असून शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करून या किडीवर योग्य व्यवस्थापन व नियंत्रण आणणे अतीआवश्यक झाले आहे. हलक्या धान कापणीचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यातच पावसाने उसंत घेतल्याने किडीवर नियंत्रण करणे शक्य होऊ शकते. मात्र कृषी विभागामार्फत सबसीडीवर शेतकºयांना औषधी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांची स्थिती नसतानाही कर्ज घेऊन महागडी औषध फवारणी करण्याचे संकट बळावले आहे. दुसरीकडे काही तालुक्यात कृषी अधिकाºयांनी बांध्यावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचेही मोहीम हाती घेतली आहे.

Web Title: The district receives 90 percent rainfall so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.