दुष्काळग्रस्त निधीतून जिल्हा बाद
By Admin | Updated: February 19, 2016 00:58 IST2016-02-19T00:58:34+5:302016-02-19T00:58:34+5:30
खरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून

दुष्काळग्रस्त निधीतून जिल्हा बाद
इंद्रपाल कटकवार ल्ल भंडारा
खरीप हंगामांतर्गत अवर्षणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नववर्षाच्या प्रारंभी शासनाने घोषीत केलेल्या दुष्काळग्रस्त निधीतून भंडारा जिल्हा बाद झाला आहे. परिणामी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी आलेल्या जिल्ह्यातील ३७१ गावांतील शेतकरी मदतीविना राहणार आहेत. कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सुल्तानी संकटाला बळी पडावे लागणार आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार, राज्याच्या विविध भागात एकूण १५ हजार ७४७ गावांमध्ये वर्ष २०१५ मधील खरीप हंगामामध्ये अपुऱ्या पावसामुळे सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झाले होते. धानाची उतारीही कमी भरली होती. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत जाहिर करण्यात आली.
यात दोन हजार कोटी रूपये बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली होती. राज्यातील एकूण दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा जिल्ह्यातील ३७१ गावे पैसेवारीच्या दृष्टीकोनातून दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली.
या गावांमधील शेतकऱ्यांना शासकीय निर्देशानुसार काही दिलासा मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती.
मात्र दोन हजार कोटी रूपयांच्या वाटपात नागपूर विभागांतर्गत फक्त दोन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
यात नागपुर १ कोटी ५९ लक्ष व गडचिरोली १४ कोटी ३६ लक्ष जिल्ह्यांचा समावेश असून भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्हे वगळण्यात आली आहेत.
अशी आहे तालुकानिहाय पैसेवारी
४खरीप पिकांची अंतिम पैसेवारी अंतर्गत जिल्ह्याची पैसेवारी ५४ पैसे आहे. तालुकानिहाय अंतर्गत भंडारा तालुक्याची पैसेवारी ६२ पैसे, पवनी ६४ पैसे, तुमसर ६१ पैसे, मोहाडी ५२ पैसे, साकोली ४४ पैसे, लाखांदूर ४८ पैसे तर लाखनी तालुक्याची आणेवारी ४४ पैसे आहे. ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या गावांची संख्या ४७५ आहे.
दुष्काळग्रस्त घोषित तालुकानिहाय गावांची संख्या
४जिल्ह्यातील एकूण ८४६ गावांतर्गत खरीप पिकांची आणेवारी ३१ डिसेंबर २०१५ ला घोषित करण्यात आली. यात ३७१ दुष्काळग्रस्त गावांपैकी भंडारा तालुक्यातील ४, तुमसर १२, मोहाडी ७०, साकोली ९४, लाखांदूर ८९ तर लाखनी तालुक्यातील १०२ गावांचा समावेश आहे.
तांदळाच्या कोठारात राजकीय उदासिनता
४पूर्व विदर्भात तांदळाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील बळीराजावर सातत्याने अस्मानी व सुल्तानी संकट येत आहे. सातही तालुक्यांमध्ये अंदाजाप्रमाणे धानाचे उत्पादन झाले नाही. निसर्गाच्या अवकृपेने उतारीत प्रचंड घट झाली. आणेवारीतही जुनी पद्धत अवलंबविल्याने बळीराजाच्या मानगुटीवर टांगती तलवार होती. जिल्ह्यातील ८४६ गावांपैकी फक्त ३७१ गावांमध्ये दुष्काळ असल्याचे घोषित झाले. आणेवारीच्या फटक्यात जिथे जास्त नुकसान झाले, तिथे सरासरीत मापदंडात शेतकरी भरडला गेला. दुसरीकडे राजकीय उदासिनतेमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषित झालेल्या निधीत भंडारा जिल्ह्याला स्पष्टपणे डावलण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी आतातरी जागे होणार काय, असा सवाल आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या यादीसह शासनाकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने अजुनपर्यंत निर्णय प्राप्त झालेला नाही. याकडे पाठपुरावा सुरु आहे.
-डॉ. सुजाता गंधे,
उपजिल्हाधिकारी (महसूल) भंडारा.