पाण्याने व्याकूळ वन्यजीव शिकाऱ्यांच्या निशाण्यावर
By Admin | Updated: May 6, 2015 00:43 IST2015-05-06T00:43:30+5:302015-05-06T00:43:30+5:30
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडते. परिणामी पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी मानवी ...

पाण्याने व्याकूळ वन्यजीव शिकाऱ्यांच्या निशाण्यावर
जंगलातील जलस्रोत पडले कोरडे : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव
भंडारा : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडते. परिणामी पाण्याच्या शोधात असलेले वन्यप्राणी मानवी वसाहतीकडे येत आहेत. नेमके हेच हेरून शिकाऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या शिकारीचा सपाटा लावला आहे. शिकारीनंतर या प्राण्यांच्या मांसाची विक्री होत असताना वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे डोळेझाक करीत आहेत.
भंडारा वन विभागाकडे शेकडो एकर वनक्षेत्र आहे. लगतच उमरेड कऱ्हांडला, नागझिरा, आंबागड या वनविभागाच्या सीमा व क्षेत्र आहे. उन्हाच्या तीव्रतेने वन क्षेत्रातील पानवठे कोरडे पडत आहेत. परिणामी तृष्णा भागविण्याकरिता पाण्याच्या शोधात भटकंती करीत फिरणारे हरिण, रोही, मोर, ससे, रानडुकरे हे वन्यप्राणी आढळतात. हे प्राणी भटकंती करीत मानवी वसाहती लगत येत आहेत. वनक्षेत्राच्या बाहेर येताच या वन्यप्राण्यांवर शिकारी नजर ठेवून असतात.
तुमसर व पवनी तालुक्यात शिकारीच्या बऱ्याच टोळ्या असून या टोळ्यांकडे गावठी बंदूक, भाले, नायलॉन दोरीचे जाळे तसेच लोखंडी सापळे आहेत. या लोखंडी सापळ्याला शिकारी ‘टिचकारा’ म्हणतात. वसाहतीलगत असलेल्या ओलिताच्या शेताजवळ बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे.
रात्रीच्या वेळी वन्यप्राणीदेखील शोध लावत याच ठिकाणी आपली तहान भागवतात. अशा ठिकाणी शिकाऱ्यांकडून वन्यप्राण्यांचा मार्ग काढला जातो व नंतर खात्री झाल्यावर या परिसरात सापळे लावले जाते. या सापळ्यात अडकलेल्या प्राण्यांना शिकारी शस्त्रााने मारतात.
सापळ्यात प्राणी अडकला नाही तर नंतर गावठी बंदुकीने शिकार केली जाते. शिकार केल्यानंतर या प्राण्यांच्या मांसाची टोळीतील सदस्यांमध्ये हिस्सेवाटणी होते. हिस्सेवाटप झाल्यावर शिल्लक असलेल्या मांसाची हे परिचितांना विक्री करतात. (शहर प्रतिनिधी)
बारुदऐवजी माचिसच्या गुलाचा वापर
शिकाऱ्यांकडे असलेल्या गावठी बंदुकीला ‘भरमार’ म्हणतात. याला लागणारी बारुद मान्यताप्राप्त दुकानातून केवळ परवानाधारक शस्त्र असणाऱ्यांना मिळते. शिकाऱ्यांकडे असलेल्या बंदुकीला कोणताही परवाना नसतो. म्हणून हे लोक बारुदीऐवजी ‘तांबड्या फॉस्फोरस’चा वापर करतात. तांबडा फॉस्फोरससाठी आगपेटी (माचिस) मधील काड्यावरील गूल करून याचा वापर ते बारूद म्हणून करतात. बंदुकीच्या नळीमध्ये धातूचे तुकडे टाकून त्याची ठासून गोळी बनवून ते शिकारीसाठी वापर करीत आहेत.