कीटकजन्य आजाराने दहा बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: July 28, 2014 23:20 IST2014-07-28T23:20:59+5:302014-07-28T23:20:59+5:30
लोकांना सुदृढ आरोग्य मिळावे, यासाठी शासनातर्फे दरवर्षी कोट्यावधीच्या योजना राबविण्यात येतात. मात्र योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी मागील तीन वर्षात किटकजन्य आजाराने साकोली

कीटकजन्य आजाराने दहा बालकांचा मृत्यू
आरोग्य धोक्यात : साकोली रुग्णालयात तीनच वैद्यकीय अधिकारी
संजय साठवणे - साकोली
लोकांना सुदृढ आरोग्य मिळावे, यासाठी शासनातर्फे दरवर्षी कोट्यावधीच्या योजना राबविण्यात येतात. मात्र योजना लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. परिणामी मागील तीन वर्षात किटकजन्य आजाराने साकोली तालुक्यातील दहा बालकांना जीव गमवावा लागला आहे. साकोली उपजिल्हा रुग्णालयात केवळ तीनच डॉक्टर असल्यामुळे येथे रुग्णांची हेळसांड होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात किटकजन्य आजाराने तालुक्यातील जनता त्रस्त होते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे लोकांना खाजगी डॉक्टरांकडून उपचार करावा लागतो. त्यामुळे रुग्णांची लुट सुरू आहे. परिणामी पैशाअभावी काही रुग्णांना उपचारही करता येत नाही. साकोली तालुक्यात एकोडी, विर्शी, गोंडउमरी, सानगडी, खांबा याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र यातील बहुतेक वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नसून बाहेरगावहून ये-जा करीत असतात. यावर्षी जून महिन्यात साकोली तालुक्यात डेंग्युची साथ होती. रुग्णांना रक्त नमुन्याची तपासणी व औषधोपचार खाजगी रुग्णालयात करावा लागत आहे.
साकोली उपजिल्हा रुग्णालयात या आजाराची तपासणी झाली नाही. किटकजन्य आजाराने साकोली तालुक्यात तीन वर्षात दहा बालकांचा मृत्यु झाल्याची नोंद तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे.
सन २०११ मध्ये जयेश गजानन मेश्राम (२) रा.उमरी याचा चंडीपुरा या आजाराने, सन २०१२ मध्ये साहिल रामटेके (११) रा.विर्शी याचा जापानी मेंदूज्वर आजाराने, साहिल मारोती गोंधळे (२) रा.पळसपाणी याचा मेंदूज्वराने, ईसरत ईसराईल शेख (१३) रा.साकोली याचा डेंग्युने, चंद्रकांत गोविंदा गायधने (१८) रा.गडकुंभली, विशाखा अरविंद येवले (८) सानगडी याचा डेंग्युने मृत्यू झाला. सन २०१३ मध्ये माधुरी सोमनाथ लंजे (११) रा.साकोली, यश गिरीधारी मानकर (२) रा.साकोली, डुडेश्वर लक्ष्मण गांढरे (३०) रा.विर्शी याचा डेंग्यु आजाराने मृत्यु झाल्याची नोंद आहे.