थेट मृत्यूलाच आव्हान !

By Admin | Updated: June 4, 2014 23:29 IST2014-06-04T23:29:07+5:302014-06-04T23:29:07+5:30

कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून

Direct death to challenge! | थेट मृत्यूलाच आव्हान !

थेट मृत्यूलाच आव्हान !

खबरदारी गरजेची : प्रवासात चुकाल तर जीवाला मुकाल
नंदू परसावार / तथागत मेश्राम - भंडारा
कोचच्या दारावर उभे राहून मोबाईलवर गप्पा मारणारे अनेक प्रवासी बोलण्याच्या ओघात कोचखाली पडतात. गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात जाण्याची पाळी येते. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दोन दिवस शुद्धीवरही येत नाहीत. हा निष्काळजीपणा अनेक प्रवाशांच्या जीवावरही बेततो. अनेकदा रेल्वेस्थानकावर उशिरा पोहोचलेले प्रवासी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा प्रकारच्या असंख्य घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलिही सावधगिरी बाळगताना दिसत नाहीत. याबाबत जनजागृती करूनही प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
रेल्वे प्रवासात प्रवाशांसोबत दररोज लुटीच्या अनेक घटना घडतात. प्रवासात प्रवाशांना लुटणारी टोळी रेल्वेगाड्यात प्रवाशांच्या भोळेपणाचा फायदा घेत असतात. त्यांना खाद्यपदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांची सर्रास लूट केली जाते.
अनेकदा प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्यांचे सोनेचांदीचे दागिने पळविण्याचे प्रकार घडतात. रेल्वेत प्रवास करताना रेल्वे प्रशासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतू त्या नियमाकडे डोळेझाक करण्यात येत असल्यामुळे ते प्रवाशांच्या जीवितावर बेतते. यामुळे प्रवासाला निघताना प्रवाशांनी काळजी घेऊनच आपला बचाव करण्याची गरज आहे.
अवैध व्हेंडरला म्हणा ‘नो’
रेल्वेत खाद्यपदार्थांची विक्री करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने व्हेंडर्सची नियुक्त केलेले असते. यासाठी त्यांना रीतसर खाद्यपदार्थ विकण्याचा परवाना व ओळखपत्र रेल्वेकडून देण्यात येते. परंतु अनेकदा रेल्वेत कुठलाही परवाना नसताना अनेक अवैध व्हेंडर्स खाद्यपदार्थ विकताना दिसतात. त्यांच्याकडील चटपटीत खाद्यपदार्थ दिसले की प्रवाशांच्या जीभेला पाणी सुटते. कुठलाही विचार न करता प्रवासी खाद्यपदार्थ विकत घेऊन खातात. या खाद्य पदार्थात गुंगीचे औषध असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशाने असे खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर ते बेशुद्ध होतात. त्याचा फायदा घेऊन त्यांचे महागडे साहित्य, पैसे चोरीला जाण्याच्या घटना घडतात.
महागडे दागिने घालून झोप घेणे टाळा
प्रवासात बहुतांश महिला महागडे दागिने पर्समध्ये ठेवून बर्थवर बिनधास्तपणे झोपी जातात. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन अशा महिलांचे दागिने चोरट्यांकडून लंपास होतात. अलीकडे तर रेल्वे प्रवासात अशा घटना नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे प्रवासात महागडे दागिने घालून किंवा पर्समध्ये पैसे ठेवून झोपणे म्हणजे चोरीला निमंत्रण देण्यासारखे ठरणारे आहे.
 

Web Title: Direct death to challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.