रेल्वे प्रवासात मधुमेहींची खाण्या-पिण्याची चिंता मिटणार; आता 'या' गाड्यांमध्ये 'डायबेटिक फूड'ची असणार सोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 19:31 IST2025-11-04T19:30:38+5:302025-11-04T19:31:07+5:30
Bhandara : डायबेटिक फूडमध्ये तूप-मसालेविरहित भाजी, गव्हाची किंवा मल्टिग्रेन चपाती, ब्राउन राइस किंवा बाजरीचा भात. साखरविरहित दही किंवा ताक, फळांचे नियंत्रित प्रमाणातील तुकडे, साखर न टाकता बनवलेला ग्रीन टी यांचा समावेश राहणार आहे.

Diabetics will no longer have to worry about food and drink during train travel; now 'diabetic food' will be available in these trains
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेह रुग्णसंख्येचा विचार करून भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि दुरांतोसारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये 'डायबेटिक फूड'ची सोय करण्यात येणार आहे. तिकीट आरक्षण करताना प्रवासी 'सामान्य जेवण' किंवा 'डायबेटिक फूड' या दोन पर्यायांपैकी आपला पर्याय निवडू शकतील. सुविधांमुळे प्रवास सुखकारक होणार आहे.
डायबेटिक फूडमध्ये काय असणार, ही माहिती असावी
डायबेटिक फूडमध्ये तूप-मसालेविरहित भाजी, गव्हाची किंवा मल्टिग्रेन चपाती, ब्राउन राइस किंवा बाजरीचा भात. साखरविरहित दही किंवा ताक, फळांचे नियंत्रित प्रमाणातील तुकडे, साखर न टाकता बनवलेला ग्रीन टी यांचा समावेश राहणार आहे.
रेल्वे प्रवासात मधुमेहींची खाण्या-पिण्याची चिंता मिटणार
अलीकडे अनेक मधुमेही रुग्ण रेल्वे प्रवासात अन्नामुळे त्रस्त असतात. स्टेशनवरील खाद्यपदार्थामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील शुगर लेव्हल वाढते. आता रेल्वेतील 'डायबेटिक फूड' पर्यायामुळे प्रवास सुरक्षित व आरोग्यदायी ठरणार आहे. मधुमेहींनी माहिती ठेवणे गरजेचे आहे.
डायबेटिक फूड म्हणजे काय ?
डायबेटिक फूड म्हणजे मधुमेहींसाठी तयार केलेला कमी साखर, कमी चरबी आणि उच्च फायबरयुक्त आहार आहे. यात रक्तातील साखर वाढवणारे घटक टाळले जातात आणि पोषक तत्त्वांवर अधिक भर दिला जातो.
रेल्वेत 'डायबेटिक फूड' मिळणार
रेल्वे प्रशासनाने देशभरातील निवडक गाड्यांमध्ये या सुविधेची सुरुवात केली आहे. लवकरच ती टप्प्याटप्प्याने इतर गाड्यांपर्यंतही विस्तारली जाणार आहे. विशेष म्हणजे, आहार मेन्यू भारतीय खाद्यसंस्कृतीला अनुसरूनच तयार करण्यात आला आहे.
"प्रवासादरम्यान योग्य आहार मिळणे हे मधुमेहींसाठी अत्यावश्यक असते. या उपक्रमामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि प्रवास आरोग्यपूर्ण बनेल. रेल्वेतील 'डायबेटिक फूड' ही कल्पना आरोग्यदायी आहे."
- डॉ. सौरभ रोकडे, मधुमेहतज्ज्ञ, भंडारा