धानपिकाची मरणासन्न अवस्था
By Admin | Updated: October 19, 2015 00:44 IST2015-10-19T00:44:32+5:302015-10-19T00:44:32+5:30
धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात पिकावर किडींचा प्रादुर्भाव व पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे.

धानपिकाची मरणासन्न अवस्था
अल्प जलसाठा, पावसाचा अभाव
देवानंद नंदेश्वर भंडारा
धानाचे कोठार म्हणून प्रसिध्द असलेल्या भंडारा जिल्ह्यात पिकावर किडींचा प्रादुर्भाव व पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. संकट डोळ्यासमोर असतानाही अखेरक्षणी तरी मिळेल त्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. कर्जाचा डोंगर उभा करुन महागडी किटकनाशके खरेदी करीत आहे. भेगा पडलेल्या शेतजमीनीला ओलित करण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत असल्याचे हेलावणारे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. दुसरीकडे शासन-प्रशासन शेतकऱ्यांची जणू थट्टाच करीत असल्याने धान शेती वाचविण्यासाठी धावपळ सुरु आहे.
जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ६३ हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ९८.७५ टक्के एवढी आहे. धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. मृगाच्या प्रारंभी धो धो बरसलेल्या पावसाने आगामी पीक वाढीसाठी पाठ फिरविली. आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात पिकांसाठी अपेक्षित पाऊस बरसला नाही. त्यामुळे कधी मोटारपंपांच्या सहाय्याने तर कधी तलाव, बोड्यांमधून पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून झाला. सप्टेंबर महिन्यात पंधरवड्यानंतर परतीचा पाऊस बरसला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. त्यानंतर पिकांवर किडींच्या प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे ऐन गर्भावस्थेत असलेल्या धान पिकावर याचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकरी धान पिकाचे रोप घेवून कृषी केंद्रात गर्दी करीत आहेत. किड नियंत्रणात यावी, अशी मदतीची हाक केंद्र संचालकांना करीत आहेत.
राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत अनुदानावर देण्यात येणाऱ्या औषधींचा पुरवठा अत्यल्प आहे. यावर्षी तरी निसर्ग साथ देईल आणि पीक होईल, अशी आशा होती, परंतु यावर्षीही पावसाने दगा, किडींचा हल्ला यामुळे लागवड खर्चही निघण्याची स्थिती आहे.
आतापर्यंत ८२ टक्के पाऊस
आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०७०.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. १८ आॅक्टोबरपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ८२ टक्के आहे. यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात धानपिकाची ९७.६९ टक्के म्हणजेच १ लक्ष ७७ हजार ८६६ हेक्टरमध्ये लागवड झालेली आहे. त्यामुळे धानपिकाच्या रोपांना एका पाण्याची गरज आहे. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार १८ आॅक्टोंबरपर्यत जिल्ह्यात १३०९.१ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आजपर्यंत १०७०.३ मिमी पाऊस पडला आहे. सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मान्सुनचे केवळ १३ दिवस शिल्लक आहेत.
६३ प्रकल्पांत केवळ ३३ टक्के जलसाठा
शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणाऱ्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ ३०़०७ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे़ या विभागातंर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत़ या प्रकल्पात केवळ १७.५८ टक्के जलसाठा आहे. यात चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २४़८६, बघेडा ६़२३, बेटेकर बोथली १.७१ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा निरंक आहे़ जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे़ सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा ३६़११ टक्के आहे़ माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा ५२.७९ टक्के आहे़ पावसाळा ऋतू सुरु असताना जलसाठा अत्यल्प असल्याने खरीप पिकांना फटका बसत आहे. याचा परिणाम रबी पिकांसह पिण्याचे पाणी, चाऱ्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.