जिल्ह्यात धान रोवणी जोमात
By Admin | Updated: July 21, 2014 23:41 IST2014-07-21T23:41:05+5:302014-07-21T23:41:05+5:30
जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त

जिल्ह्यात धान रोवणी जोमात
५३ टक्के पाऊस : ४० टक्के रोवण्या आटोपल्या, शेतकऱ्यांना दिलासा
भंडारा : जुलैच्या पंधरवडापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अखेर सुरूवात केली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात धाानाच्या रोवण्या फक्त २.०७ टक्के पार पडल्या होत्या. आता ती ४० टक्क्यांपर्यंत पोहचली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात यावर्षी १ लाख ८१ हजार ५९१ हेक्टर क्षेत्र धान लागवडीखाली येणार आहे. यातील १७ हजार ३४६ हेक्टरपैकी १६ हजार १४१ हेक्टर क्षेत्रात धान पऱ्यांच्यामाध्यमातून म्हणजे सरासरी ९३ टक्के धान रोवणीची लागवड करण्यात आली आहे. सध्यास्थितीत सुरू असलेल्या पावसाच्या प्रमाणात आवत्याने धानाची रोवणीत मोठी वाढ झाली आहे. आवत्याने धानाची लागवड जवळपास १४० टक्क्यांवर पोहचली आहे. जिल्ह्यात १० हजार २११ हेक्टरवर आवत्याने धानाची रोवणी होणार असून, या तुलनेत जिल्ह्यात १४ हजार ३५८ हेक्टर क्षेत्रात आवत्याने धानाची रोवणी झाली आहे. यावर्षी पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने रोवणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात पार पडली असून ती जवळपास ७० हजार हेक्टरपर्यंत पोहचली आहे.
भंडारा तालुक्यात २२ हजार ८८८ हेक्टर क्षेत्रात धानाची रोवणी करण्यात येणार आहे. मोहाडीत २८ हजार ८३० हेक्टर, तुमसर २८ हजार ३४० हेक्टर, पवनी २९ हजार ३९३ हेक्टर, साकोली २२ हजार ०७० हेक्टर, लाखनी २० हजार ५३० आणि लाखांदूरमध्ये २९ हजार ७२० हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कृषी विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात तीन दिवसांपासून धानाच्या रोवण्यांना जोमाने सुरूवात झाली आहे. तुमसर, मोहाडी तालुक्यात पावसाची स्थिती चांगली असल्याने तेथील शेतकरी धान रोवणी आटोपण्याच्या कामात गुंतले आहे.
उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
समाधानकारक पाऊस पडल्याने यावर्षी धान उत्पादन कमी होण्याऐवजी वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हा कृषी अधिक्षक हनुमंत कुदले यांच्याशी संपर्क साधला असता, पूर्वमध्ये कमी पाऊस पडल्याने धान रोवण्या उशिरा झाल्याने शेतकरी चिंतीत होते आणि धान उत्पादन कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दमदार पावसाने ही चिंता आता मिटली आहे. (शहर प्रतिनिधी)