केसलवाड्यात डेंग्यूचा उद्रेक

By Admin | Updated: June 22, 2014 23:52 IST2014-06-22T23:52:47+5:302014-06-22T23:52:47+5:30

मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे डेंग्यूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात डेंग्यूचा पसार झालेला असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे.

Dengue eruption in Kesalwad | केसलवाड्यात डेंग्यूचा उद्रेक

केसलवाड्यात डेंग्यूचा उद्रेक

सहा रुग्ण आढळले : आरोग्य यंत्रणा सुस्त, रुग्णांमध्ये बालकांचा समावेश
युवराज गोमासे - करडी (पालोरा)
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे डेंग्यूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात डेंग्यूचा पसार झालेला असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे. प्रभावी नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. रुग्ण तुमसर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे.
मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे डेंग्यूचा प्रकोप जाणवला असून आतापर्यंत सहा रुग्णांना याची लागण झाल्याचै वैद्यकीय तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. आजारी रुग्णांमध्ये प्रणय रामेश्वर मेश्राम (११), प्रेम गौरीशंकर देवगडे (१२), साक्षी अरविंद साठवणे (३) तेजस अशोक साठवणे (४), आचल अशोक साठवणे, रुपेश हिरालाल साठवणे या बालकांचा समावेश आहे. सर्व रुग्ण तुमसर येथील अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी चार रुग्णांना नुकतीच सुटी देण्यात आली असून प्रणय मेश्राम व प्रेम देवगडे आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात आणखी रुग्ण आजारी आढळून आले. रुग्ण योग्य उपचाराअभावी त्रस्त आहेत. मात्र कुणीही त्यांच्या व्यथांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे. फक्त ७५० लोकसंख्या असलेल्या केसलवाडा गावात सहा रुग्ण आढळून आल्याने नागरिकात भितीचे वातावरण आहे. पावसाळ्यात पुन्हा डेंग्यूचा उद्रेक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने डेंग्यू रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग व त्यांची यंत्रणा खडबडून जागी व्हायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही. आरोग्य विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. गावाचा सर्व्हे व रुग्ण तपासणी करण्यात आलेली नाही. रक्त तपासणी व पाण्याचे नमूनेही घेण्यात आलेले नाही किंवा नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले नाही.
करडी व पालोरा येथे सुद्धा डेंग्यूचा उद्रेक जाणवला असताना आरोग्य विभागाने धडा शिकलेला नाही. त्यामुळे परिसरातील अनेक गावातून डेंग्यूचा उद्रेक होताना दिसत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांनी केसलवाडा गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. आरोग्य विभागाला गावात शिबिर लावण्याची, गावाचा सर्व्हे व रुग्ण तपासणी करण्यासाठी कळविले. ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा नाल्यांची साफ सफाई व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुचविले. यावेळी सरपंच नत्थू इनवाते, शामराव गजबे, ओबीसी छावा संग्राम तालुकासचिव उमेश तुमसरे, यादोराव साठवणे, अरविंद साठवणे, विरेंद्र रंगारी, अन्नू सपाटे, भूपेंद्र पवनकर व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Dengue eruption in Kesalwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.