बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST2021-01-20T04:34:29+5:302021-01-20T04:34:29+5:30
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती, कामगार आयुक्त, उपायुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांची संयुक्त बैठक झाली. ...

बांधकाम कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देण्याची मागणी
महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती, कामगार आयुक्त, उपायुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांची संयुक्त बैठक झाली. यात बांधकाम कामगाराच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढून ऑनलाइन नूतनीकरण व अर्ज भरण्याची पद्धत बंद करण्याच्या मागणीवर चर्चा घडवून आणण्यात आली. यावर दोन्ही पक्षांकडून एकमताने मागण्या मंजूर करून तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्णय घेण्यात आला, पण त्यावर कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही.
भंडारा व गोंदिया जिल्हा इमारत व इतर बांधकाम असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त भंडारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदान, ३१ डिसेंबरपूर्वी ज्यांनी अर्ज सादर केले, अशा कामगारांना ५ हजाराचे अनुदान अदा करणे, कोरोनाच्या प्रादुर्भावाने नूतनीकरण न झाल्याचे नूतनीकरण पुन्हा करून घेणे, बांधकाम कामगाराने घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सहायक कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शरदचंद्र वासनिक, अध्यक्ष विजय कांबळे, डॉ.विनोद भोयर व सामाजिक कार्यकर्ते रितेश वासनिक व कोषाध्यक्ष आषित बागडे उपस्थित होते.