अन्नातून विषबाधेने मुलाचा मृत्यू, आईवडील, भाऊ अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2022 22:41 IST2022-06-28T22:40:52+5:302022-06-28T22:41:27+5:30
Bhandara News अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली.

अन्नातून विषबाधेने मुलाचा मृत्यू, आईवडील, भाऊ अत्यवस्थ
भंडारा : अन्नातून विषबाधा झाल्याने एका १५ वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या
आईवडिलांसह लहान भाऊ अत्यवस्थ झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथे मंगळवारी घडली. वडिलांवर भंडारा येथे, तर आई व लहान भावावर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
परमानंद फुलचंद मेश्राम (१५) असे मृत बालकाचे नाव आहे, तर फुलचंद गणपत मेश्राम (५३), दुर्गा फुलचंद मेश्राम (४५) आणि चेतन फुलचंद मेश्राम (१३) अशी प्रकृती गंभीर असलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील माडगी येथे मेश्राम परिवार राहतो. रविवारी रात्री या सर्वांनी लाल भाजी खाल्ली, तर सोमवारी सकाळी चवळीची भाजी खाल्ली. मात्र, दुपारनंतर त्यांना उलटी व हगवण सुरू झाली. त्यामुळे सर्वांना लाखनी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, परमानंदची प्रकृती गंभीर असल्याने, त्याला सायंकाळी भंडारा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडिलांची प्रकृती मंगळवारी गंभीर झाल्याने त्यांनाही भंडारा येथे आणण्यात आले. आई व मुलावर लाखनी येथे उपचार सुरू आहेत.
अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत असले, तरी जिल्हा रुग्णालयातून डॉक्टरांनी मेंदूज्वर किंवा विषबाधा असल्याचा संशय व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणीतून खरे कारण पुढे येणार आहे. आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आहे.
- डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी