बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 12:45 IST2020-06-03T12:45:14+5:302020-06-03T12:45:38+5:30
तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली.

बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तलावात बुडत असलेल्या पत्नीला वाचविण्याच्या प्रयत्नात पतीसह भाच्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साकोली येथील नवतलावात मंगळवारी सकाळच्या सुमारास घडली. आसिफ दिलावर शेख (३५) व शोएब बुटो दुधकनोज (१५) दोन्ही रा.सिव्हील वॉर्ड साकोली असे मृत पावलेल्या मामा - भाच्याची नावे आहेत.
आसिफ हा कुटुंबासह सिव्हील वॉर्डात राहतो. तो कधी आईसक्रीम तर कधी मक्याची लाही विकून कुटुंबाचा गाडा चालवित असे. सध्या लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार बंद होता. त्यातूनच घरी उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. हाताला जे काम मिळेल ते करून आसिफ जीवनयापन करीत होता. आज सकाळी आसिफ व त्याच्या पत्नी घरगुती काणामुळे भांडण झाले. भांडण इतके विकोपाला गेले की, त्याची पत्नी घराशेजारी असलेल्या नवतलावकडे पळत सुटली. तिच्या पाठोपाठ आसिफ व घरातील मंडळी धावली. पाहता पाहता आसिफच्या पत्नीने तलावात उडी घेतली. तिला वाचविण्यासाठी आसिफ, त्याचा भाचा शोएब व आसिफचा भाऊ या तिघांनी तलावात उडी घेतली. तिघांनीही आसिफच्या पत्नीला वाचविले. मात्र आसिफ व त्याचा भाचा हे दोघेही खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. खोल भागात जाऊन फसल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मामा भाच्याचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. साकोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.