बिबट्याची १५ तास मृत्यूशी झुंज

By Admin | Updated: February 26, 2015 00:25 IST2015-02-26T00:25:28+5:302015-02-26T00:25:28+5:30

पवनी येथून १० कि.मी. अंतरावरील वलनी शेतशिवारात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एक बिबट्या जमिनीला समतल असलेल्या आणि कठडे नसलेल्या विहिरीत पडला.

Death for the leopard for 15 hours | बिबट्याची १५ तास मृत्यूशी झुंज

बिबट्याची १५ तास मृत्यूशी झुंज

पवनी / आसगाव : पवनी येथून १० कि.मी. अंतरावरील वलनी शेतशिवारात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास एक बिबट्या जमिनीला समतल असलेल्या आणि कठडे नसलेल्या विहिरीत पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. चार फुट पाण्यात हा बिबट्या १५ तास मृत्यूशी झुंज देत राहिला. बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी या बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढले.
वलनी - आसगाव परिसरातील एका ऊसाच्या शेतात सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा बिबट दबा धरून बसला होता. तो शेतात असल्याची माहिती मिळताच परिसरातील शेकडो ग्रामस्थ त्याला बघण्यासाठी तिथे पोहचले.
यावेळी बिबट व नागरिकांमध्ये अनेक तास लपाछपीचा खेळ चालला. दरम्यान दुपारी २ च्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या अनिल कोरे याच्यावर बिबट्याने झडप घातली. यात अनिल जखमी झाला असला तरी रस्त्यालगत असलेल्या बिना कठड्याच्या विहिरीत बिबट पडला. जखमी अनिलला पवनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान बिबट विहिरीत पडल्याने याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या विहिरीत बिबट पडला ती जवळपास ५० फुट खोल होती. विहिरीचा व्यास कमी असल्याने बिबट जखमी झाला. विहिरीत सुमारे चार फुट पाणी होते. यात हा बिबट्या जीव वाचविण्यासाठी धडपडू लागला होता. त्यातच त्याला वाचविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
रात्री उशिर झाल्याने अंधार पडल्याने त्याला वाचविण्यात वनविभागाला यश आले नाही. आज पहाटेपासून वनविभागाने त्याला वाचविण्याची पराकाष्टा केली. दरम्यान विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी भंडारा, पवनी अड्याळ, नागपूर व गोंदिया येथून वनविभागाचे पथक पाचारण करण्यात आले.
शेवटी तब्बल १५ तासानंतर गळ व जाळीच्या सहाय्याने पहाटे पाच वाजताच्या सुमारास बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. तिथून त्याला अड्याळ येथील वनविभागाच्या कार्यालयात नेऊन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याच्यावर औषधोपचार करण्यात आला.
तब्बल १५ तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर बिबट्याला विहिरीबाहेर सुखरुप काढता आल्याने वनविभागानेही सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी उपवनसंरक्षक विनय ठाकरे, ए.सी.एफ. बिसने, गोखले, दिलीप डुडे, वनपरिक्षेत्राधिकारी महेशपाठक मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांच्यासह भंडारा, पवनी, अड्याळ, लाखांदूर वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट मोहीम राबविण्यात आली. (शहर प्रतिनिधी / वार्ताहर)

या बिबट्याला कशाप्रकारे बाहेर काढण्यात आले याविषयी तिथे उपस्थित मानेगावचे पशुधनविकास अधिकारी डॉ.गुणवंत भडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या विहिरीत हा बिबट पडलेला होता तो पाच ते सहा वर्षाचा आहे. विहिरीत जवळपास चार फुट पाणी असल्यामुळे बिबट्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर तो पाण्यात पडल्यास त्याचा जीव जाण्याची भिती होती. त्यामुळे बाहेर काढण्यासाठी विहिरीत मोठ्या प्रमाणात तणीस टाकली. जसजसी तणीस बिबट्याच्या अंगावर पडायची तसतसा तो त्या तणसीला पायाखाली दाबून शरीर पाण्याबाहेर काढत होता. विहिरीत पाण्याची पातळी चार फुटपर्यंत असल्यामुळे तीन ते चार फुट जाडी होईपर्यंत तणीस विहिरीत टाकण्यात आली. त्यामुळे हा बिबट तणसीला पाण्यात दाबून वर आला. एका जाळीत तणीस टाकून विहिरीमधील तणसीवर ठेवण्यात आले. १० ते १५ मिनिटात बिबट्या जाळ्यामधील तणसीत येऊन ठाण मांडला. त्यानंतर पाच ते सहा माणसांच्या मदतीने जाळे वर ओढण्यात आले. बिबट्याला तणसीच्या जाळ्यात गुंडाळून विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यावेळी त्याच्या पाठीवर थोडीशी जखम आढळून आली. सहसा विहिरीतून बिबट्या सुखरुप बाहेर काढण्याचे प्रमाण फार कमी आढळून येते. २४ तासाच्या औषधोपचारानंतर जंगलात सोडण्यात येणार आहे. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी तणसीचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे या प्रयोगावरून शक्य झाल्याचे डॉ.भडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Death for the leopard for 15 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.