पांजऱ्याच्या खेळाडूची भारतीय संघात निवड
By Admin | Updated: April 15, 2016 00:49 IST2016-04-15T00:49:47+5:302016-04-15T00:49:47+5:30
भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पांजरा येथील एका मजुराच्या मुलाची निवड झाली आहे.

पांजऱ्याच्या खेळाडूची भारतीय संघात निवड
हंगेरीत स्पर्धा : छोट्याशा गावातून घडला
मोहन भोयर तुमसर
भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी पांजरा येथील एका मजुराच्या मुलाची निवड झाली आहे. अॅथलेटिक्स क्रीडा प्रकारातील दौड स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. आकाश देवाजी शेंडे (१६) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रबळ आत्मविश्वासाच्या बळावर आकाशने हे सिद्ध करून दाखवून दिले. तुमसरहून आठ कि.मी. अंतरावर पांजरा हे ४०० लोकवस्तीचे गाव आहे. वडील लाकडे फोडण्याचे कामे करून कुटूंब चालवितात. बालपणापासून आकाशला खेळण्याची आवड होती. घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याला साहित्य उपलब्ध झाले नाही. परंतु त्याचातला खेळण्याचा गुण मात्र कमी झाला नाही.
सन २०१२ मध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अ.वा. बुद्धे यांनी स्व.फत्तुजी बावनकर क्रीडा मार्गदर्शक केंद्र सुरू केले. याची माहिती आकाशला झाली. आकाश पांजरा ते बड्डा क्रीडांगणावर सकाळी ६ व सायंकाळी ५ वाजता सरावाकरिता येत होता. धावण्याचे उपजत कौशल्य त्याच्यात असल्याचे अ.वा. बुद्धे यांनी हेरले. त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला.
सन २०१२ मध्ये पहिल्याच वर्षी त्याची निवड गडचिरोली येथील क्रीडा प्रबोधिनीत झाली. केरळमध्ये राष्ट्रीय शालेय स्पर्धे त्याने नेत्रदीपक कामगिरी करून निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातून पाच खेळाडूंची निवड करण्यात आली. सध्या आकाश दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) येथे प्रशिक्षण घेत आहे. १०० मीटर व ४०० मीटरमध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.