अंधकारातील डोळसपणा...इंद्रपाल कटकवार भंडाराजन्म व मृत्यू हे शाश्वत सत्य असले तरी माणसातील अहंकारीता त्याच्या कर्तृत्वपणावर अवलंबून असते. जोपर्यंत माणसाच्या कर्तृत्वातील ‘मी’ पण जाणार नाही तोपर्यंत माणूस दुसऱ्यासाठी झटू शकणार नाही. मानवी जीवनात विविध प्रकारचे संकट आणि संघर्ष असले तरी एखाद्या अंध व्यक्तीच्या जीवनात अंधकाराची व्याप्ती व त्याची परिभाषा कदाचित त्यालाच ठाऊक असावी. त्या अंधकारात प्रकाशाची एक किरणही अंध व्यक्तीच्या जीवनात दैदीप्यमान आशावाद निर्माण करतो. असाच अंधकारातील डोळसपणा टिपलाय आमदार बच्चू कडू यांनी.अंध व अपंगांच्या जीवनात काडीचा का आधार असेना, त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य बच्चू कडू यांनी हाती घेतले आहे. वृत्त लेखनाच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी अंध व अपंगांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करणे हा आमचा हेतू नसून त्यांनी केलेल्या व करीत असलेल्या कार्याची जनमानसाने दखल घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य हे एकमेव असे राज्य आहे जेथे अंध व अपंगांच्या समस्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर जावून लढा दिला जात आहे. राज्यात ८० तर संपूर्ण देशात ५०० पेक्षा जास्त अंध निवासी शाळा आहेत. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र तर्फे चालविण्यात येणारे उपक्रम हे विना अनुदानित आहेत. स्वयं प्रेरणेने व दानकर्त्यांच्या माध्यमातून अंध व अपंगांचा विकासाचा विडा या संघातील पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे. राष्ट्रीय स्तरावर आळंदी येथे ब्रेल प्रकाशन केंद्र चालविले जाते. सन १८८७ रोजी राज्यात अंधांसाठी निवासी शाळा सुरु करण्यात आली. तब्बल १०० वर्षानंतर म्हणजेच १९८७ ला राज्यात पहिले राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे शैक्षणिक सप्ताह सोहळा घेण्याचे ठरविण्यात आले. त्या वर्षापासून दरवर्षी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हा सोहळा घेण्यात येतो. अंध व अपंगांना शासकीय नोकरीत आरक्षणाप्रमाणे सामावून घेण्यात यावे, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यात याव्या, यासाठी हा संघ सदैव प्रयत्नशील आहेत.
अंधकारातील डोळसपणा...
By admin | Updated: December 17, 2015 00:42 IST