वादळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:51+5:302021-05-21T04:37:51+5:30
भंडारा : तालुक्यातील माडगी परिसरात गत दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उन्हाळी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

वादळी पावसाने उन्हाळी धान पिकांचे नुकसान
भंडारा : तालुक्यातील माडगी परिसरात गत दोन आठवड्यांपासून अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उन्हाळी धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी सदस्य नीळकंठ कायते यांनी केली आहे.
खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बी हंगामात निघावे यासाठी मोठ्या आशेने उन्हाळी धान पिकांची लागवड केली होती. मात्र तालुक्यातील माडगी परिसरातील टेकेपार, खुर्शीपार, राजेगाव, कन्हाळमोह, चितापूर, डव्वा, पिंपळगाव, खुटसावरी आदी परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट तसेच वादळी पावसाने हजेरी लावली. परिणामी हजारो हेक्टर शेतातील उन्हाळी धान पीक मातीमोल झाले. अनेक शेतीचे पंचनामे झाले असले तरी शेतकरी चिंतेत आहेत. त्या क्षेत्राचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य नीळकंठ कायते यांनी गुरुवारी माडगी व टेकेपार परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तलाठी, कृषी सहाय्यक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर चर्चा करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली.
यावेळी उपसरपंच जागेश्वर पाल, सदस्य दीपक पडोळे, शेतकरी दयाराम वैद्ये, ईश्वर ठवरे, योगेश्वर चौधरी, पुरुषोत्तम पाल, नितू नागपुरे, शंकर पाल, नामदेव ढोणे, दादाराम गेडेकर यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.