लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची लोकसंख्या तसेच वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बसविण्यात आलेली सिग्नल प्रणाली गेल्या चार वर्षापासून बंद पडलेली असून, ती केवळ नावालाच उरली आहे. सिग्नल खांब एकामागून एक कोसळत असून, प्रमुख चौकांवरील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे राजीव गांधी चौक व अन्य चौकात अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होत असते.
मुस्लीम लायब्ररी चौक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक व पोस्ट ऑफिस चौक येथे सिग्नल यंत्रणा निष्क्रिय झाल्याने वाहतूक नियमन करणे प्रशासनासाठी कठीण ठरत आहे. नगर परिषदेकडून बसविण्यात आलेले खांब आता गंजून पडत आहेत. सहयोग हॉस्पिटलजवळील सिग्नल खांब अज्ञात वाहनाच्या धडकेत कोसळल्याची माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष पाहणीअंती पाया गंजल्यामुळे तो आपोआप कोसळल्याचे स्पष्ट झाले.
देखभाल-दुरूस्ती थांबल्याने प्रणाली ठप्प
शहरातील सिग्नल प्रणालीची कोणत्याही टप्प्यावर वेळोवेळी देखभाल करण्यात न आल्याने खांबांचे बेस खचले आहेत आणि वायरिंग तुटली आहे. परिणामी, या ठिकाणी वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. वाहतूक शिस्त, नियमन आणि अपघाती घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यता आहे.
वाहतूक विस्कळीत, नागरिक त्रस्त
सिग्नल बंद झाल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणचे बंद पथदिवे, झुकलेले खांब आणि तुटलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे धोका वाढला आहे. नागरिकांना असुविधा सहन करावी लागत असून, विद्यार्थ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच वर्गातील भंडारेकरांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त केल्या जात आहे.
प्रशासनाची निष्क्रियता ठरली कारणीभूत
सिग्नल यंत्रणेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र त्याची देखभाल पूर्णतः थांबली आहे. सिग्नल खांब कोसळल्यानंतर देखील संबंधितांना कळविण्यात आले नाही आणि त्यांनी दुरुस्तीच्या हालचालीही केल्या नाहीत.
स्वतंत्र स्थायी यंत्रणा उभारण्याची गरज
या संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासनाकडून सतत होणारे दुर्लक्ष पाहता नागरिकांनी सिग्नल व्यवस्थेच्या मजबूत देखभालीसाठी स्वतंत्र स्थायी यंत्रणा स्थापनेची मागणी केली आहे. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून शहरातील वाहतूक यंत्रणा पुन्हा कार्यान्वित करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
"नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतुकीच्या शिस्तीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली पाहिजेत. अन्यथा सिग्नल यंत्रणेवर झालेला कोट्यवधींचा खर्च व्यर्थ ठरेल, तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे."- डॉ. बाळकृष्ण सार्वे, नागरिक, भंडारा.
Web Summary : Bhandara's traffic signals, costing crores, have been non-functional for four years, causing traffic chaos. Negligence and lack of maintenance have led to their collapse. Citizens demand immediate action and a dedicated maintenance system to restore order.
Web Summary : भंडारा में करोड़ों की लागत वाले ट्रैफिक सिग्नल चार साल से निष्क्रिय हैं, जिससे यातायात बाधित है। लापरवाही और रखरखाव की कमी के कारण वे गिर गए हैं। नागरिकों ने व्यवस्था बहाल करने के लिए तत्काल कार्रवाई और एक समर्पित रखरखाव प्रणाली की मांग की है।