शासनाचा कोट्यवधीचा निधी उपयोगाविना

By Admin | Updated: July 22, 2014 23:52 IST2014-07-22T23:52:45+5:302014-07-22T23:52:45+5:30

मागील १९ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी यावर्षीही शेतीला सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आता शाप ठरत आहे.

The crores of government funds are not used without use | शासनाचा कोट्यवधीचा निधी उपयोगाविना

शासनाचा कोट्यवधीचा निधी उपयोगाविना

संजय साठवणे - साकोली
मागील १९ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी यावर्षीही शेतीला सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आता शाप ठरत आहे. मागीलवर्षी या प्रकल्पाचे पाणी अडविल्यामुळे यावर्षी हा प्रकल्प सिंचनाच्या कामात येणार अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ती आशा आता निराशात बदलली आहे.
निम्न चुलबंद प्रकल्प कुंभली गावाजवळ दुर्गाबाई डोहच्या बाजूला चुलबंद नदीवर बांधण्याचे काम करण्यात आले असून या निम्न चुलबंद प्रकल्पाला १९९५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून आज १९ वर्षाचा कालावधी लोटला तरी हा प्रकल्प पाणी अडवून शेतीसाठी सिंचन क्षमता देण्यास असमर्थ ठरला आहे. या प्रकल्पात एकूण सात दरवाजे बसविण्यात आले असून या प्रकल्पाच्या पाण्यातून २३ गावातील एकूण ५ हजार ९९७ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या पाण्यातूनच १९ गावांना पिण्याच्या पाण्याची सोयही होणार असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
मागील १९ वर्षापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून कधी राजकीय अडथळे तर कधी निधीची कमतरता अशा अडचणीमुळे हा प्रकल्प लडखडत राहिला. ऐनकेनप्रकारे या प्रकल्पाचे सातही दरवाजे लावण्यात आले व मागीलवर्षी या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले. पाणी अडवताच शेतकऱ्यांनी टाहो फोडला.त्याला कारणही तसेच होते. पाणी अडवल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाली. पिकाचे नुकसान झाले.
या प्रकल्पावर आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला असला तरी १९ वर्षाच्या या कालावधीत हा प्रकल्प अपूर्ण असून शासनाचा कोट्यावधीचा निधी शेतकऱ्यांच्या कामात अजूनपर्यंत आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने यावर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: The crores of government funds are not used without use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.