Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरतोय, पण धोका कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 09:05 IST2021-05-11T09:04:28+5:302021-05-11T09:05:22+5:30
Bhandara news कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

Coronavirus in Bhandara; भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरतोय, पण धोका कायमच
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाच्या उद्रेकाने भयभीत झालेल्या जनतेला मे महिन्यात मोठा दिलासा मिळाला. रुग्णसंख्येसह मृत्यूंचे प्रमाणही कमी होऊ लागले. कोरोना रुग्णांचा आलेख घसरायला लागताच नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. सकाळी अत्यावश्यक खरेदीच्या निमित्ताने आणि दिवसभर विविध कारणांचा शोध घेत शहरभर भटकंती करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
रुग्णांची संख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका मात्र कायम आहे. भंडारा जिल्ह्याला एप्रिल महिना भयभीत करून गेला. दररोज सरासरी १,२०० कोरोना रुग्ण आढळून येत होते तर २० ते २५ जणांचा मृत्यू होत होता. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वचजण चिंताग्रस्त झाले होते. शासनाने संचारबंदी घोषित केल्यानंतर अनेकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. शहरी आणि ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येने नागरिक नियमांचे पालन करून लागले होते. परंतु, मे महिन्याच्या सुरूवातीपासून जिल्ह्याला दिलासा मिळाला. कोरोना रुग्णांची संख्या ५००च्या आत येऊ लागली. तसेच मृत्यूही एक आकडी संख्येत नोंदविले जाऊ लागले.
गत आठ दिवसातील कोरोना रुग्णांच्या संख्येवर नजर टाकल्यास रुग्णसंख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून येत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशास्थितीत नागरिकांची बेफिकिरी पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. रुग्णसंख्या कमी झाल्याने बाहेर पडणाऱ्यांची संख्याही गत तीन-चार दिवसात वाढली आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली भाजी बाजारात मोठी गर्दी होत आहे. बिनकामाचे अनेक तरूण रत्यावरून फिरताना दिसत आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी शहरातील नागरिकांना शिस्त लावली. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी प्रसाद दिला. त्यामुळेही गत आठवड्यात रस्त्यावर गर्दी कमी झाली होती. परंतु, आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने नागरिक पुन्हा बेफिकीर झाले आहेत.
रुग्णसंख्या कमी होत असली, तरी संसर्गाचा धोका कायमच आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक झाले आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही गरजेचे आहे. बाजारातून खरेदी करताना कोणती वस्तू कोणाकडून खरेदी करतो, याची चाचपणी करूनच खरेदी करणे गरजेचे आहे. अन्यथा खरेदीच्या आड कोरोना संसर्ग होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.