विशेष मोहिमेत ९४ हजार व्यक्तींचे कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST2022-01-02T05:00:00+5:302022-01-02T05:00:48+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविली. सूक्ष्म नियोजन आणि गावपातळीवरील यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय साधून ही मोहीम २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

विशेष मोहिमेत ९४ हजार व्यक्तींचे कोरोना लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओमायक्रॉन व्हेरिएन्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मिशन लेफ्टआऊट या विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ९४ हजार २४७ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यापैकी १८ हजार ३२ नागरिकांना पहिला तर ७६ हजार २१५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. या मोहिमेसाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व सहभागी झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र, लगतच्या नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा धोकाही पुढे दिसत आहे. या परिस्थितीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविली. सूक्ष्म नियोजन आणि गावपातळीवरील यंत्रणा यांच्यात योग्य समन्वय साधून ही मोहीम २४ ते ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आली. नागरिकांना फोन करून लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील जांब येथे फिरत्या पथकाने चक्क एका बैलगाडीवर तरुणाला लस टोचली.
शिवनी ठरले पहिले लसवंत
- लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा या गावात १०० टक्के लसीकरण झाले. त्यामुळे जिल्ह्यातील पहिले लसवंत गाव ठरले. दुर्गम भागातील आदिवासीबहुल आलेसूरही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष पुढाकार घेतल्याने लसीने संरक्षित झाले आहे. ९६ वर्षांच्या आजीबाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि गृहिणींचे कार्यस्थळी जाऊन मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण करण्यात आले.
मुंबईनंतर भंडारा अव्वल
- राज्यात मुंबईनंतर दुसरा डोस ८० टक्के पार करणारा जिल्हा म्हणून भंडारा पुढे आला आहे. ही बाब निश्चितच समाधानाची आहे. राज्यामध्ये सुरुवातीला लसीकरणामध्ये मुंबई, पुणेनंतर भंडारा जिल्हा तिसऱ्यास्थानी होता. परंतु मिशन लेफ्टआऊटच्या यशस्वितेने भंडारा जिल्हा दुसऱ्या डोसमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर आला. लसीकरणाला जिल्ह्यात गतवर्षी १६ जानेवारी रोजी प्रारंभ झाला.
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला गावपातळीवर समन्वय
- कोरोना लसीकरणासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विशेष पुढाकार घेतला. गावागावांना भेटी देऊन नागरिकांना प्रोत्साहित केले. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना भेटून त्यांना मार्गदर्शन केले. वाढती कोरोना रुग्णसंख्या ही तिसऱ्या लाटेची सूचकता दर्शविणारी आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करावा, सॅनिटायझर वापरावे, शारीरिक अंतर ठेवावे.