कोरोनाने बाजारपेठेत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:45+5:30

दरम्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजतापासून शहरातील पानठेले, टपरी, बिअर बार, वाईन शॉप, बार अ‍ॅण्ड रेस्टारेंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सकाळपासूनच या आदेशाची अंमलबजावणी केली जात होती. शहरात सकाळपासून सर्वत्र शुकशुकाट दिसत होता.

Corona shook the market | कोरोनाने बाजारपेठेत शुकशुकाट

कोरोनाने बाजारपेठेत शुकशुकाट

Next
ठळक मुद्देप्रतिबंधक उपाययोजना : पानठेले, टपरी, बार रेस्टॉरंट बंद, ५५ वर्षावरील शासकीय कर्मचाऱ्यांना वर्क फॉर होम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी युध्दस्तरावर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असून भंडारा शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत शुक्रवारी सकाळपासूनच शुकशुकाट दिसत होता. मात्र नागरिकांचे रस्त्यावरुन आवागमन सुरु होते. पोलीस आणि नगर परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची माहिती दिवसभर ध्वनीक्षेपकावरुन दिली जात होती.
दरम्यान गुरुवारी सायंकाळी ५ वाजतापासून शहरातील पानठेले, टपरी, बिअर बार, वाईन शॉप, बार अ‍ॅण्ड रेस्टारेंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सकाळपासूनच या आदेशाची अंमलबजावणी केली जात होती. शहरात सकाळपासून सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. पोलिसांचे वाहन सूचना देत फिरत होते. मात्र पोलीस जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशा व्यतिरिक्त इतर दुकानेही बंद करण्याची सक्ती करत असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसत होते. नागरिकांचे आवागमन सुरु होते.
शहरातील काही भागात पानठेले आणि टपऱ्या सुरु असल्याचे चित्रही दिसत होते. मात्र या बंदमुळे चहा आणि खर्रा शौकिनांची मोठी पंचाईत झाल्याचे दिसत होते. भंडारा येथील तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात सामान्य नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली असून नागरिकांनी आपल्या तक्रारी व्हॅटस्अ‍ॅप अथवा लेखी स्वरुपात पाठवाव्या असे सूचित करण्यात आल्या आहे. जिल्हा परिषदेनेही नागरिकांना कार्यालयात येवून गर्दी करु नये अशी सूचना जारी केली आहे.
भंडारा शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही बंदचा परिणाम जाणवत आहे. ग्रामीण भागातील सर्व हॉटेल, पानटपºया बंद करण्यात आल्या आहेत.
दादाजी पुण्यतिथी सोहळा रद्द
भंडारा लगतच्या भिलेवाडा येथे गुडीपाडव्याच्या दिवशी २५ मार्च रोजी दादाजी धुणीवाले यांच्या पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्च रोजी आयोजित जागरण आणि पुण्यतिथी सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती पंचकमेटीने दिली आहे.
तुमसरमध्ये बाजारपेठ बंद
तुमसर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जीवनावश्यक वस्तुच्या दुकानाव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने तुमसर शहरात शुक्रवारी कडकडीत बंद होता. पोलीस प्रशासनाने सकाळी ९.३० वाजतापासून शहरातील व्यवसायीकांना आपली दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. गर्दी टाळण्याचे आदेश दिले आहे.

भंडारात नऊ जण विलगीकरण कक्षात
भंडारा जिल्ह्यात कोरोनाग्रस्त एकाही रुग्णाची शुक्रवारपर्यंत नोंद झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. विदेशातून आलेल्या १४ पैकी नऊ जणांना नर्सिंग महाविद्यालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून पाच जणांना घरीच एकांतवासात ठेवण्यात आले आहे. विदेशातून आलेल्या १४ ही व्यक्तींच्या हातावर प्रौढ टू प्रोटेक्ट भंडारा होम क्वॉरंटाईन्ड असे शिक्के मारण्यात आले आहे. दोन नियंत्रण कक्ष तयार केले आहे.

साकोली कलम १४४
साकोली उपविभागात साकोली व लाखनी तालुक्यात २० मार्चच्या मध्यरात्रीपासून फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तालुक्यातील संपूर्ण क्षेत्रामध्ये लोकांचा समुह जमविणे यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आले आहे. उलंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

आदेशाची अंमलबजावणी सुरू
भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व रेस्टारेंट व हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी शुक्रवारी दिले.
शासकीय रुग्णालयातील विद्युत पुरवठा अंखडीत राहावा त्यात कोणतीही अडचण येवू नये यासाठी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सतत जिल्हा शल्यचिकित्सकांच्या संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहे.
आॅटोरिक्षात केवळ दोन प्रवासी
जिल्ह्यातील काळी-पिवळी टॅक्सी तात्काळ बंद करण्याच्या सूचना लागू करण्यात येत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यातील शहरांमध्ये सुरु असलेल्या आॅटोरिक्षा व सायकलरिक्षात केवळ दोन प्रवासी वहन करण्याचे आदेश २१ मार्चच्या सकाळी १० वाजतापासून लागू करण्यात येत आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून निवासी उपजिल्हाधिकाºयांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कर्मचाºयांना वर्क फार होम आदेश देण्यात आले आहे. तसेच गर्भवती महिला कर्मचाºयांनाही हे आदेश लागू करण्यात आले आहे. मात्र या काळात त्यांना आपले मोबाईल पूर्ण वेळ सुरु ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यातील ४० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व मोठे उद्योग कारखाने, खदानी हे २१ मार्च रोजी सकाळी १० वाजतपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना तसेच सर्व आधार केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी दुकाने मात्र यातून वगळण्यात आली आहे.

सिहोरा परिसरात केवळ नवरदेवालाच ‘एन्ट्री’
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात नवदेवालाच एन्ट्री देवून वरातीचे वाहन परत पाठविण्यात आले. सिंदपूरी येथे एका मुलीचे लग्न शुक्रवारी दुपारी १२ आयोजित करण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यातून नवरदेव वऱ्हाड्यासह येथे आले. पंरतु धरण मार्गावरच वाहन थांबविण्यात आले. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. केवळ नवरदेवाच्या वाहनाला एन्ट्री देण्यात आली. नवदेवासह पाचजण लग्नसमारंभाला उपस्थित झाले. अन्य आठ ते दहा वाहने आल्या पावली परत गेली. गर्दी टाळण्यासाठी हा उपाय करण्यात आला असून आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणूपासून प्रतिबंध करण्यासाठी नागरिकच स्वत:हून पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे.

भंडारा, पवनी तालुका क्षेत्रात मनाई आदेश
भंडारा उपविभागांतर्गत भंडारा व पवनी तालुक्यात उपविभागीय दंडाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. त्यानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र शासकीय कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि बसस्थानक क्षेत्राला वगळण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची दुकाने सुरु ठेवण्यास मनाई करण्यात आली असून त्यातून भाजीपाला, किरणा, औषधी, दुध डेअरी, फळाचे दुकाने, जलकेंद्र व इंटरनेटसेवा वगळण्यात आली आहे. सभा, मेळावे, उपोषण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आयोजनावरही प्रतिबंध आणला आहे. सर्व रेस्टारेंट आणि खानावळेही बंद ठेवण्यात आली असून निषिद क्षेत्रात नारेबाजी करणे, भाषण करणे आदींवर बंदी आणण्यात आली आहे. तसेच मंगल कार्यालय व हॉलही भाड्याने देण्यास मनाई करण्यात आले आहे. ही अधीसूचना २० मार्चच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत अंमलात राहणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्ह्यात कुठेही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे.

Web Title: Corona shook the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.