कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:34 IST2021-04-25T04:34:48+5:302021-04-25T04:34:48+5:30

बारव्हा : कोरोनामुळे शाळांना सुट्या आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. या सुट्यांमुळे मुलांच्या बाराखडीवर परिणाम होत आहे. बाराखडी म्हणजे ...

Corona affects student learning | कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम

बारव्हा : कोरोनामुळे शाळांना सुट्या आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच आहेत. या सुट्यांमुळे मुलांच्या बाराखडीवर परिणाम होत आहे. बाराखडी म्हणजे शिक्षणाची सुरुवात. जी लहान बालक गेल्यावर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी शाळेत गेली, त्यांना कोरोनामुळे सुट्या मिळत असल्याने त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना बाराखडी ओळखणेसुद्धा अवघड झाले आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शासनाने शाळा बंद करून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. हा पर्याय म्हणावा तितका यशस्वी होऊ शकला नाही. ऑनलाइन शिक्षणामध्ये अनेक अडचणी आहेत. ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे, ते पालक आपल्या पाल्यांना स्मार्टफोन घेऊन देण्यास सक्षम नाही. परिणामी, ऑनलाइन शिक्षणाचे तीन तेरा वाजल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.

शाळेत विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा धाक असतो. घरी पालकांचा मुलावर म्हणावा तसा धाक राहत नाही. धाकामुळे विद्यार्थी अभ्यास करतात. मात्र, घरी ऑनलाइन शिक्षण घेताना कुणाचाही धाक नसल्याने त्याचा परिणाम शिक्षणावर होत आहे.

ज्या पाल्यांचे पालक सुशिक्षित आहेत, ते मुलांना घरी थोडंफार शिकवतात. मात्र, ग्रामीण भागातील अशिक्षित पालक आपल्या मुलांना शिकवण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे मुले बाराखडी पूर्णपणे विसरतात की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

दिवसभर ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले मोबाइलवर गेम खेळणे, व्हिडिओ पाहणे यात आपला वेळ घालवीत आहे.

प्रत्यक्षात मिळत असलेल्या शिक्षणामुळे मुलांना पाढेसुद्धा पाठ झाले नाही. आता साधे बेरीज, वजाबाकीसुद्धा चौथी, पाचवीच्या मुलांना जमत नाही.

नुकत्याच शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे टेन्शनच राहिले नाही. परीक्षाच नाहीत, तर मग अभ्यास कशाला करायचा, असा उलट सवाल मुले पालकांना करत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. येणाऱ्या नवीन सत्रात शिक्षकांना विद्यार्थ्यांवर चांगली मेहनत घ्यावी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Corona affects student learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.