संघटनबांधणी करून काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2016 00:49 IST2016-07-26T00:49:02+5:302016-07-26T00:49:02+5:30
भंडारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.

संघटनबांधणी करून काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देणार
पत्रपरिषद : प्रेमसागर गणवीर यांचे प्रतिपादन
भंडारा : भंडारा जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. जिल्ह्यातील जनता काँग्रेसवर प्रेम करणारी आहे. येणाऱ्या काळात या सर्वांना संघटीत करून काँग्रेसशी जुळून असलेल्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात जोडून वरिष्ठांपासून सामान्य कार्यकर्त्यांचा मानसन्मान, युवा व महिला कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने संघटनबांधणी करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.
यावेळी ते म्हणाले, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ मिळावा व कर्मठ कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी तालुका, पंचायत समिती व जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय निरीक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. शेतकरी, ओबीसी, महिला, अल्पसंख्यांक, अनु.जाती, जमाती, शिक्षक, युवक काँग्रेस, एनएसयुआय आदी काँग्रेसचे विविध सेल व संघटनांना मजबूत केले जाईल. या संघटनांच्या माध्यमातून बुथ पातळीवपासून समस्यांचे संकलन करून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
आगामी भंडारा, तुमसर, पवनी, साकोली नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर उतरणार आहे. काँग्रेसतर्फे स्वच्छ प्रतिमेचे, प्रामाणिक आणि लोककल्याणासाठी समर्पीत उमेदवार देण्यात येतील. पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, दळणवळण, शिक्षण व अन्य स्थानिक पातळीवरील महत्वपूर्ण मुद्दे, समस्यांचे संकलन केले जात आहे. विकासासाठी पोषण वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांच्या इच्छा, त्यांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करून शहरांचा सर्वंकष विकास कसा करण्याच्या दृष्टीने वॉर्ड व शहरनिहाय विशेष योजना तयार करण्यात येत आहे. योग्य वेळेवर त्याची घोषणा करण्यात येईल.
स्वप्नरंजन करून केंद्र व राज्यात भाजपा-शिवसेना सत्तेत आली. सत्तेवर येऊन दोन वर्षाचा काळ लोटला आहे. परंतु एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. धानाला ३००० रूपये भाव देण्याची घोषणा लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपने केली होती. या घोषणेचे काय झाले? याचे उत्तर मात्र दिले नाही.
खरेदी केलेल्या धानाचे चुकारे देण्याइतपत पैसे राज्य सरकारजवळ नाहीत. विजेचे दर वाढलेले आहे. महागाई वाढलेली आहे. उपसा सिंचन प्रकल्प बंद पडले आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासने अद्याप मतदार विसरले नाहीत. दरवर्षी एक कोटी युवकांना रोजगार, मेक इन इंडिया, स्कील इंडिया यासारख्या घोषणा दिल्या. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात कोटींची प्रकल्प होण्याची स्वप्ने दाखविण्यात आली होती. ही स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. काँग्रेसप्रणीत युपीए सरकारने मंजूर केलेल्या सरकारच्या कार्यकाळात भूमिपूजन होऊन काम सुरू झालेल्या भेल प्रकल्पाचे काम बंद पडून आहे.
सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या केंद्र व राज्य सरकार विरोधात जनतेच्या मनात चीड आहे. काँग्रेसचे कार्यकर्ता गृहभेटीच्या माध्यमातून सरकारचे पितळ उघडे पाडतील. प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव प्रमिला कुटे, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, नगरसेवक शमीम शेख, शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुकाध्यक्ष राजकपूर राऊत, अनिक जमा पटेल, अजय गडकरी, मुकुंद साखरकर, भूषण टेंभुर्णे, मार्कंड भेंडारकर, सचिन फाले व पृथ्वी तांडेकर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)