शास्त्री विद्यालयातील बांधकाम ‘बीओटी’ तत्त्वावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:42+5:302021-08-24T04:39:42+5:30
भंडारा : येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या परिसरात व्यापारी संकुलाचे बांधकाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधा वापरा व हस्तांतरित ...

शास्त्री विद्यालयातील बांधकाम ‘बीओटी’ तत्त्वावरच
भंडारा : येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या परिसरात व्यापारी संकुलाचे बांधकाम होत आहे. जिल्हा परिषदेच्या बांधा वापरा व हस्तांतरित करा प्रकल्पांतर्गत हे बांधकाम होत आहे. ‘बीओटी’ तत्त्वावर होत असलेल्या या बांधकामामुळे भंडारा शहराच्या विकासात भर पडेल, अशी माहिती संबंधित प्रकल्पाचे सल्लागार महेश कांडलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या ताब्यातील मोक्याच्या जागेवर वारंवार अतिक्रमणे होत होते. त्यामुळे त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत होते. वारंवार होणारे अतिक्रमण काढण्याकरिता अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल तयार करणे जेणेकरून जिल्हा परिषदेला उत्पन्न सुद्धा प्राप्त होणार आहे. त्या अंतर्गत राज्य सरकारने १ सप्टेंबर २००८ रोजी शासन निर्णयाला अनुसरून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील भूखंड खाजगीकरणाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी भंडारा जिल्हा परिषदेच्या सभेत १६ मार्च २०१८ रोजी ठराव पारित करण्यात आला होता. या ठरावांतर्गत लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या एकूण क्षेत्रफळापैकी काही क्षेत्रात व्यापारी संकुलाचे, महिला बचत गट भवनाचे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष तथा उपाध्यक्ष यांच्या निवासस्थानाचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्या अंतर्गत सर्व बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला सर्व प्रकारच्या तांत्रिक बाबींची मंजुरी प्रदान करण्यात आल्याचेही कांडलकर यांनी सांगितले. शासन स्तरावर स्पर्धात्मक निविदा बोलाविण्यात येऊन ई व्हिजन कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांची ८ मार्च २०१९ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने सादर केलेल्या अहवालाला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. तसेच या प्रकल्पाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी ही तांत्रिक मंजुरी प्रदान केली असल्याचे ४ डिसेंबर २०२० च्या पत्रानुसार स्पष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विकासकाकडून विविध बाबींविषयी हमी मिळाल्यानंतर तर राज्य शासनाने अंतिम मंजुरी प्रदान केली आहे. यात १० मार्च २०१९ रोजी ग्रामविकास विभागाने प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देऊन भूखंड विकसित करण्याला अंतिम मंजुरी प्रदान केली. यावेळी बँक गॅरंटीही देण्यात आली होती, त्यानंतर प्रत्यक्षात प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या व्यावसायिक संकुल प्रकल्पात तळमजल्यावरील १०१ दुकान गाळ्यांचे बांधकाम होणार असून ३५३ लक्ष तसेच १४६ लक्ष रुपयांचे बांधकाम मोफत करून मिळणार आहेत. याव्यतिरिक्त जिल्हा परिषद भंडाराला दरवर्षी शंभर प्रतिचौरस मीटर प्रतिवर्ष दराने तीन लक्ष रुपयाचे लीज भाडेही प्राप्त होणार आहे. जिल्हा परिषदेच्या बीओटी प्रकल्पामुळे भंडारावासीयांना याचा लाभच होईल, तसेच व्यवसाय उद्योगाला चालना मिळेल, असेही महेश कांडलकर यांनी सांगितले.