बांधकाम विभागाची सारवासारव सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:36 IST2017-02-22T00:36:12+5:302017-02-22T00:36:12+5:30
वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांसह अन्य वृक्षांची कटाई केली.

बांधकाम विभागाची सारवासारव सुरु
दखल लोकमतची : प्रकरण वृक्ष कटाईचे, मनसेच्या तक्रारीने धास्तावले अधिकारी
भंडारा : वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांसह अन्य वृक्षांची कटाई केली. यात मोठी अनियमितता असल्याची तक्रार मनसेने केली आहे. याबाबत आज ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कारवाईच्या धास्तीने अधिकाऱ्यांनी सावरासावर सुरु केली आहे.
भंडारा तालुक्यातील कारधा-खमारी, कारधा-दवडीपार या रस्त्यालगतच्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई केली आहे. याबाबत वनविभागाकडे विचारणा केली असता त्यांनी काही वृक्षांची परवानगी घेतल्याची माहिती दिली आहे. यामुळे या मार्गावर करण्यात आलेल्या वृक्ष कटाईत मोठा गौडबंगाल असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी केला आहे. याची त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.
वाहतुकीला अडथळ्याच्या नावावर बांधकाम विभागाने वृक्षकटाई करताना रस्त्यापासून दूर असलेल्या व त्या वृक्षांमुळे वाहतुकीला अडथळा होणार नसल्याची बाब माहित असतानाही त्यांची कत्तल करण्यात आली. एकीकडे वनसंपदा जोपासण्याची भूमिका शासन घेत असून त्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहे. तर येथील बांधकाम विभागाने रस्त्यालगतच्या वृक्षांची कत्तल करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शहारे यांनी केली आहे. मार्च महिना हा वित्तीय वर्षाचा शेवटचा महिना असल्याने बांधकाम विभागाला प्राप्त निधी खर्चित करायचा आहे. यासाठी हा विभाग यापेक्षा अनेक गौडबंगाल कामे करून निधी खर्चित दाखविण्यात मागेपुढे पाहणार नाही. चौकशी करण्याची मागणी शहारे यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
लोकमतच्या वृत्ताने खळबळ
‘वाहतुकीत अडथळा ; वृक्षांची कटाई’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने आज सार्वजनिक बांधकाम विभागातील कारभाराची माहिती चव्हाट्यावर आणली. यामुळे वृत्त प्रकाशित होताच येथील अधिकारी व वृक्ष कटाई करणाऱ्या ठेकेदारामध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरण अंगलट येईल या भीतीने त्यांनी आता सावरासावर सुरु केली असून तक्रारदार विजय शहारे यांच्या भ्रमणध्वनीवर आज या विभागातून फोन करण्यात आला. यावेळी त्यांना विनापरवाना वृक्ष कटाई केल्याप्रकरणी कंत्राटदाराकडून रक्कम वसुल करण्यात येईल त्यामुळे तुम्ही तक्रार परत घ्या अशी गळ घालण्यात आल्याची माहिती शहारे यांनी ‘लोकमत’ला दिली.
भंडारा, खडकी मार्गाचे निकृष्ट काम
भंडारा ते खडकी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्यांची डागडुजी करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले. या रस्त्यावरील हे पॅचेस बुजविताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून त्यात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे हे पॅचेस निकृष्ट झाले असून येत्या कालावधीतच पुन्हा येथे खड्डे दिसून येणार असल्याचा आरोप शहारे यांनी केला आहे.
माहितीच्या अधिकारात माहिती दडवली
कारधा - खमारी, कारधा - दवडीपार या मार्गावरील करण्यात आलेल्या वृक्ष कटाई बाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा यांना माहिती अधिकारांतर्गत माहिती मागितली. याबाबत संबंधित विभागाने शहारे यांना १०८ पानांच्या माहितीसाठी २१६ रुपये भरण्यासंबंधात पत्र दिले. पत्रानुसार शहारे यांनी बांधकाम विभागाकडे पैसे जमा केले असून आता आठवडा लोटल्यानंतरही त्यांना माहिती देण्यास येथील अधिकारी टोलवाटोलव करीत आहेत. माहिती दिल्यानंतर संबंधित विभागाचे पितळ उघडे पडेल या भीतीने सदर माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती समोर येत आहे.