काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:33 IST2016-01-12T00:33:07+5:302016-01-12T00:33:07+5:30

अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला.

Congress used minority | काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला

काँग्रेसने अल्पसंख्यकांचा वापर केला

पत्रपरिषद : जमाल सिद्धीकी यांचा आरोप
भंडारा : अशिक्षितपणाचा फायदा घेत आजपर्यंत काँग्रेसने अल्पसंख्यंक समाजाचा वापर करून घेतला. आमच्याजवळ मेहनत करणारे आणि बुद्धीवान लोक आहेत. संधीचीही कमी नाही. केवळ शिक्षणाचा अभाव असल्याने अल्पसंख्यक समाज मागे आहे. संघटनेच्या माध्यमातून अल्पसंख्यंक समाजाला मजबूत करीत शिक्षणासोबत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजबांधवापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे भाजप अल्पसंख्यंक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांनी स्पष्ट केले.
अल्पसंख्यक आघाडीच्या बैठकीसाठी ते सोमवारला भंडारा येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अल्पसंख्यक समाजामध्ये जनजागृती आणण्याचा प्रयत्न पक्षसंघटनेच्या माध्यमातून करीत आहे. प्रत्येकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करणार असून यासाठी संघटनेतील एक कार्यकर्ता २० मुलांना दत्तक घेऊन हा प्रयत्न करणार आहे. मुसलमान असल्याचा ठपका ठेवून निवडणुकीत उमेदवारी नाकारली जाते, या प्रश्नावर ते म्हणाले, आमच्यामध्ये कमतरता आहे. शिक्षित, अनुभव असणारे आणि काम करणारे लोक पुढे येत नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते. पक्षाकडून प्रत्येकवेळी संधी दिली जाते, असे सांगून भविष्यात अधिकाधिक लोकांचा यात सहभाग कसा राहील? या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजना अल्पसंख्यांक बांधवापर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
मौलाना आझाद महामंडळातील कर्जाची वसुली व्हावी
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना कर्ज देण्यात आले आहे. आघाडी शासनाच्या काळात ठराविक काँग्रेस कार्यकर्त्यांना कर्ज देण्यात आले. आज या कर्जाची वसूली न झाल्याने महामंडळ तोट्यात आहे. नवीन लोकांना कर्ज न मिळण्याचे हेही महत्वाचे कारण आहे. अशा कर्ज घेऊन बुडविण्याची वृत्ती ठेवणाऱ्यांवर कारवाई करीत कर्जाची वसुली करावी व महामंडळाचे बंद कार्यालय सुरु करावे, अशी मागणी केली असून यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री तारिक कुरैशी, माजी सभापती कलाम शेख, अल्पसंख्यंक आघाडीचे प्रदेश सचिव आबीद सिद्धीकी, प्रदेश उपाध्यक्ष मोसीन खान, कार्यालयमंत्री मुस्ताकभाई उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Congress used minority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.