काँग्रेस-राकाँ कार्यकर्त्यांचा माहौल
By Admin | Updated: July 16, 2015 01:00 IST2015-07-16T01:00:35+5:302015-07-16T01:00:35+5:30
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आजचा दिवस राजकिय दृष्ट्रीक्षेपातून महत्वपूर्ण ठरला.

काँग्रेस-राकाँ कार्यकर्त्यांचा माहौल
भंडारा : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आजचा दिवस राजकिय दृष्ट्रीक्षेपातून महत्वपूर्ण ठरला. भाजपकडून सत्ता हस्तांतरीत केल्यानंतर काँग्रेस-राकाँ कार्यकर्त्यांचा जल्लोष वाखाणन्याजोगे होता. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड होणार असल्याने आज दिवसभर कार्यकर्त्यांचा गोतावळा व त्यांनी केलेला माहौल जिल्हा परिषद परिसरात पाहावयास मिळाला.
कार्यकर्त्यांची गर्दी
निवडणूक म्हटली की, कार्यकर्त्यांची गर्दी हमखास बघायला मिळते. जिल्हा परिषदेत आज अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड होणार असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या परिसरात जमले होते.
निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजता नंतर सुरू झाली असली तरी सकाळी १० वाजतापासूनच कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात येणे सुरू केले होते. परिणामी जिल्हा परिषदेच्या आजुबाजूचा परिसर कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.
जिल्हा परिषद इमारत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरच असल्याने ट्रॉफिक जाम होवू नये याची पोलिस विभागामार्फत काळजी घेतली जात होती. कुठल्याही कार्यकर्त्याला आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड होणार असल्याने शहर पोलिसांचा सकाळपासूनच जिल्हा परिषद परिसरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संभाव्य उमेदवारांची नावाची घोषणा व त्यानंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावावर झालेल्या शिक्का मोर्तब, या काळात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. याचवेळी पोलिसांनी कर्तव्य दक्षता बाळगूण व्यवस्थाही चोख ठेवली होती. जिल्हा परिषदेच्या तिन्ही गेटवर पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त होता.
कर्मचाऱ्यांमध्येही उत्सुकता
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर कुणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सूकता असताना जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. सभेच्या दरम्यान जिल्हा परिषदेतील कर्मचारी वऱ्हांड्यात येवून घडत असलेल्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून होते. अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याचीही सर्वत्र चर्चा होती.
गुलालाची उधळण
काँग्रेस-राकाँची आघाडी झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. पक्षांतर्गत घोषणाबाजी देवून परिसर दणाणून सोडला. (प्रतिनिधी)