काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रवाहापासून दूर ठेवले
By Admin | Updated: July 26, 2016 00:48 IST2016-07-26T00:47:20+5:302016-07-26T00:48:04+5:30
काँग्रेस पक्षाने मागील ६५ वर्ष देशात राज्य केले. मुस्लीम बांधकांचे एक गठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी...

काँग्रेसने मुस्लीम समाजाला प्रवाहापासून दूर ठेवले
जमाल सिद्दीकी यांचे प्रतिपादन : मुस्लीम बांधवांनी भाजपात प्रवेश करण्याचे आवाहन
भंडारा : काँग्रेस पक्षाने मागील ६५ वर्ष देशात राज्य केले. मुस्लीम बांधकांचे एक गठ्ठा मतदान पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेसने मुस्लीम बांधवांना भारतीय जनसंघ, भारतीय जनता पक्ष यांचे भय दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. परंतु मुस्लीम समाजाला हे कळून चुकले आहे की, भाजपच्या मुख्य प्रवाहात सामील झाले तरच कौमची प्रगती आहे. त्यामुळे अधिकाधिक मुस्लीम बांधवांनी भाजपमध्ये प्रवेश घेवून कौमचे भवितव्य घडवावे, असे प्रतिपादन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले.
भंडारा येथील मुस्लीम लायब्ररी सांस्कृतिक सभागृहात शहर भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे वतीने शनिवारी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार रामचंद्र अवसरे, कलाम शेख, आबीद सिद्दिकी, भंडारा भाजप जिल्हाध्यक्ष तारिक कुरेशी, शमीमा शेख, महेजबीन खान, अजीज शेख, कलीम खान, डिम्मू शेख, फुरकान पटेल, चंदू रोकडे, सुनिल मेंढे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी हाजी नाझीर पटेल यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश घेतला. यावेळी सिद्दीकी यांनी, शिक्षणापासून दूर राहिल्याने मुस्लीम समाज मागे राहिला. छोटेमोठे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे अनेक कर्तबगार तरूण समाजात आहे. मात्र, त्यांच्याजवळ प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाकिची आहे. मुद्रा लोणच्या माध्यमातून केंद्र सरकारने छोट्या उद्योगात काम करणाऱ्या तरूणांसाठी उद्योजक होण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. भाजपमध्ये मुस्लीम समाज बांधवांचा प्रवेश म्हणजे आगामी नगरपालिकेवर भाजपच्या यशाची नांदी आहे.
यासोबतच समाजातील एका विशिष्ट गटाने एका पतसंस्थेच्या नावावर कोट्यवधींचा अपहार केला. याची चौकशी होवून दोषींवर फौजदारी कारवाई करून गरिबांची ठेव परत करण्यास सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन सिद्दीकी यांनी यावेळी केले. याप्रसंगी तारिक कुरेशी, कलाम शेख, आमदार अवसरे यांनी मार्गदर्शन केले. आभार डिम्मू शेख यांनी मानले. कार्यक्रमाला मुस्लीम समाजबांधवांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)