कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 05:00 IST2020-06-11T05:00:00+5:302020-06-11T05:00:57+5:30
कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दिली व पाठपुरावा केला होता.

कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे आयुक्तांचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शहरातील घनकचरा उचलणाऱ्या कंत्राटदाराने सफाई कामगारांना बेकायदेशीरपणे कामावरून कमी केले होते. त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याचे निर्देश भंडारा सहायक कामगार आयुक्त उ. सु. लोया यांनी दिले आहेत.
तुमसर नगरपरिषद अंतर्गत शहरातील घनकचरा संकलन करून त्याला डम्पिंग यार्डापर्यंत वाहतूक करण्याचे कंत्राट नागपूर जिल्ह्यातील शारदा महिला मंडळाला तीन वर्षांपासून दिले आहे. या कंत्राटदाराकडे ४० ते ५० सफाई कंत्राटी कामगार कामावर असताना महाराष्ट्र कामगार कायद्यानुसार न्यूनतम वेतन राशी देण्यात येत नव्हती.
कामगारांनी आपल्या हक्काच्या रक्कमेची मागणी केली असता कंत्राटदाराने लॉकडाऊनच्या काळात १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले. याबाबत शिवसेनेने पुढाकार घेऊन नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे आणि सहायक कामगार आयुक्त उ.सु. लोया भंडारा यांना तक्रार दिली व पाठपुरावा केला होता.
याची तातडीने दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी ९ जून रोजी त्यांच्या दालनामध्ये कंत्राटदार, नगरपरिषद मुख्याधिकारी आणि कामगार यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याच्या दृष्टीने सुनावणी केली.
यावेळी शिवसेनेचे दिनेश पांडे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभुवनकर व माजी आमदार चरण वाघमारे यांनी कंत्राटी कामगारांवर अन्याय झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावर सहायक कामगार आयुक्तांनी कंत्राटदाराने कामावर असलेल्या कायद्यानुसार कामगारांच्या पूर्ण वेतन व भविष्य निर्वाह निधी आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे शोषण होऊ नये याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून सर्व अन्यायग्रस्त १६ कामगारांना त्वरित कामावर परत घेण्याचे आदेश दिले. तसेच त्यांना कायदेशीर वेतन तरतूद करावी असेही निर्देश दिले. या सुनावणीला संबंधित कंत्राटदार गैरहजर होते. त्यामुळे सबब या प्रकरणाबाबत पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश सहायक कामगार आयुक्तांनी दिले. यावेळी सफाई कंत्राटी कामगार मारोती बर्वे, गोविंद भोंडेकर, कमल कनोजे, जितेंद्र भवसागर नागराज मेश्राम, संतोष भोडेकर, सदानंद बर्वे व नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी शैलेंद्र मोघरे उपस्थित होते. आयुक्तांच्या निर्देशाने कामागारांना दिलासा मिळाला आहे.