वरठी रस्त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST2020-10-11T05:00:00+5:302020-10-11T05:00:06+5:30
गत दोन - अडीच महिन्यांपासून रस्ता पूर्णपणे उखडून पडला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे. हे न समजण्या पलिकडचे कोडे आहे. राज्यमार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरुन प्रवास करताना जीव जातो की काय असा प्रश्न पडत आहे. याच मार्गाने गुरुवारी दुपारी अनेक मंत्र्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा देखील प्रवास झाला. असे असताना रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.

वरठी रस्त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच लक्ष घाला
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील तुमसर मार्गावरील शास्त्री चौक ते वरठी रस्त्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने वाहनधारकांना खड्ड्यातून वाहने काढताना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. हा रस्ता भंडारा शहरात प्रवेश करणारा मुख्य मार्ग असून गत काही दिवसापासून या रस्त्याबद्दल नागरिकांतून ओरड होत आहे. मात्र तरी देखील बांधकाम विभागाला जाग येत नसल्याने आता जिल्हाधिकारी साहेब, आता तुम्हीच या रस्त्याकडे लक्ष घाला असा सूर नागरिकांसह सामान्य नागरिकांतून होत आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडला असून राज्य मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणी कसरत ठरत आहे.
गत दोन - अडीच महिन्यांपासून रस्ता पूर्णपणे उखडून पडला आहे. मात्र याकडे बांधकाम विभागाचे का दुर्लक्ष होत आहे. हे न समजण्या पलिकडचे कोडे आहे. राज्यमार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून रस्त्यावरुन प्रवास करताना जीव जातो की काय असा प्रश्न पडत आहे. याच मार्गाने गुरुवारी दुपारी अनेक मंत्र्यांचा ताफा तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा देखील प्रवास झाला. असे असताना रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष का असा संतप्त सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. तुमसर, मोहाडीकडे जाणारा मुख्य मार्ग असल्यामुळे या महामार्गावर सतत मोठी वर्दळ असते. महापूरानंतर या महामार्गची वाईट अवस्था झाली आहे.
शास्त्री चौक ते वरठी रस्त्याची दुरुस्ती न केल्यास भाकपच्यावतीने रास्ता रोको आंदोलनाचा इशारा हिवराज उके, यादोराव बांते, सदानंद इलमे, प्रितेश धारगावे यांनी दिला आहे.
जीवीतहानीची प्रतीक्षा करताय काय
मध्यप्रदेशकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मोठी वाहने जाताच दुचाकीधारकांना दगड गोट्यांसह धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा याबाबत निवेदने देवून झाली मात्र बांधकाम विभागाला मात्र जाग येत नसल्याने संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना जीवीतहानीची प्रतिक्षा आहे काय असा सवाल विचारला जात आहे.