सर्दी, खोकला होताच उभा राहतोय नागरिकांच्या अंगावर काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 11:25 IST2020-09-21T11:23:51+5:302020-09-21T11:25:25+5:30
कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे.

सर्दी, खोकला होताच उभा राहतोय नागरिकांच्या अंगावर काटा
संतोष जाधवर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : वातावरणातील बदलाने अनेकांना सर्दी, खोकला, अंगदुखीसह तापाची लक्षणे जाणवत आहे. कोरोनाच्या धास्तीने साधी सर्दी, खोकला झाला तरी अंगावर काटा उभा राहतो. डॉक्टरकडे जायचीही भीती वाटते. अनेक जण अशा स्थितीत घरगुती उपाय करून अंगावर आजार काढताना जिल्ह्यात दिसत आहे. दवाखान्यात जावे तर कोरोना तपासणीची धास्ती आणि नाही जावे तर प्रकृती आणखी खालावते काय, याची चिंता.
भंडारा जिल्ह्यात गत दोन महिन्यांपासून कोरोना रुग्ण आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधितांचा आकडा तीन हजार ७३६ वर शनिवारी पोहचला होता. तर ८० जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला. अशातच वातावरणातील बदलाने विषाणूजन्य आजारांची लागण झाली आहे. तसेही दरवर्षी या महिन्यात सर्दी, ताप, खोकला होताच. त्यावर रुग्णालयात जावून उपचारही केला जातो. परंतु यावर्षी स्थिती वेगळी आहे. साध्या शिंका यायला सुरूवात झाली तर मनात नाना शंका घर करून बसतात. सर्दी आणि खोकला झाला तर भीतीत भर पडते आणि ताप आला तर कुठेतरी आपण कोणाच्या संपर्कात तर आलो नाही ना याचा दहादा विचार सुरू होतो. याचे कारण म्हणजे सध्या कोरोना संसर्गाचा वाढता प्रादूर्भाव होय.
याच कारणाने अनेक जण अंगदुखी, ताप, सर्दी, खोकला झाला तरी अंगावरच काढत आहे. एकीकडे सोशल मीडियातून कोरोनावर नीट उपचार होत नसल्याची ओरडच आहे. खासगी रुग्णालयात जावे तर अनेक डॉक्टरांचे दार बंद असते. विनंती केल्यानंतर तपासणी करायची म्हटले तरी आधी कोरोना टेस्टचा आग्रह केला जातो. हे सर्व माहित असतानाही नियमांचे पालन मात्र कुणी करताना दिसत नाही. मास्क वापरणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे सक्तीचे केले आहे. प्रशासनाने दंडाची तरतूद केली आहे. त्यानंतरही अनेक जण मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी माझे कुटुंब सुरक्षित कुटुंब मोहीम राबविली जात आहे. यासोबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जिल्हा रुग्णालयासह कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील पाहणी केली. प्रशासन गांभीर्याने कोरोना निर्मूलनासाठी प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र त्याला तडे देताना दिसत आहे. जिल्ह्यात गावागावांत जनता कर्फ्यू आयोजित करूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत कुठे घट होताना दिसतस नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नागरिक बिनधास्तपणे आजही फिरताना दिसून येतात.
वैद्यकीय उपचार महत्वाचे
कोणत्याही आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. अलिकडे अनेक जण दुखणे अंगावर काढताना दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य साथ निर्माण झाली आहे. भंडारा शहरात आलेल्या पुरामुळेही अनेक जण आजारी पडले आहेत. अशा स्थितीत रुग्णांनी घाबरून न जाता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच आजाराची लक्षणे दिसतातच तपासणी करणे महत्वाचे आहे. यासोबतच पुरेशी झोप, दैनंदिन योग प्राणायम, गरम पाणी प्राशन, बाहेरचे खाणे टाळणे, फल आहार वाढविणे आणि कुटुंबात आनंदी राहणे आवश्यक असल्याचे येथील साई क्लिनिकचे डॉ. दिलीप गुरीपुंजे यांनी सांगितले आहे. मनात कोणतीही शंका आली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले
घरगुती उपचारावरच भर
विषाणूजन्य आजाराची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडे जाण्याची गरज असते. परंतु शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे जाण्यासाठी अनेक जण टाळतात. तर खाजगी रुग्णालयात डॉक्टर प्रतिसाद देत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळेच आता अनेक जण घरच्या घरीच उपचार करताना दिसतात. विविध वनस्पतींचा काढा, हळदीयुक्त दूध, निंबू पाणी, मिठाच्या पाण्याच्या गोळ्या, अद्रकाचा चहा घेण्यावर नागरिकांचा भर आहे. घरातील एक जण आजारी पडला की दुसराही आजारी पडतो. त्यामुळे कोरोनाची धास्ती वाढत आहे. अशा स्थितीत नागरिकांनी लक्षणांना न घाबरता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवून उपचार करण्याची खरी गरज आहे.